जळगाव प्रतिनिधी । शहरातील अहुजा नगर येथील राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला मागून जोरदार धडक देवून मालवाहू वाहन समोरुन येणार्या ट्रकवर धडकून तिहेरी अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या दुचाकीधारक आणि मालवाहू पिकव्हॅन चालक गंभीर जखमी झाले आहे. ट्रकसह चालकासह क्लिनरला तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
व्हॅनवरील चालक अशोक सुकदेव रोकडे रा. पिंप्राळा व दुचाकीस्वार पंढरी नामदेव नन्नवरे (वय-५८ )रा. बांभोरी हे जखमी झालेल्यांची नावे आहेत. ट्रकसह चालक व क्लिनरला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी परिवहन मंडळातील सेवानिवृत्त निरिक्षक पंढरी नामदेव नन्नवरे यांचे जळगाव शहरातील आहुजानगर येथेही घर आहे. ते शुक्रवारी सकाळी बांभोरी येथून दुचाकीने (क्र. एम.एच. 19 ए डब्लू 9102 ) आहुजानगर येथे येत होते. त्यांच्या पाठोपाठ मालवाहू वाहन (एम.एच.19 एस.6757) ही जळगावकडे येत होते. मालवाहू वाहनाने ओव्हरटेकच्या नादात समोर नन्नवरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यानंतर मालवाहू वाहने समोरुन पाळधीकडे जात असलेल्या युपी 72 एटी.3565 ट्रकवर धडकला. जोरदार धडकेमुळे दुचाकीवरुन नन्नवरे हे फुटबॉलसारखे उडून रस्त्यालगत असलेल्या खड्डयात झाडाझुडपांमध्ये पडले. तर त्यांची दुचाकी ही ट्रकवर जावून लटकलेली होती. ट्रकवार आदळलेल्या मालवाहू वाहनाचा समोरुन चक्काचूर झाला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसहेड कॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, राजेंद्र पवार, प्रीतम पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील हे तपासासाठी एरंडोलकडे जात होते. त्याच्यासमोरच अपघाताची घटना घडल्याने त्यांनी मालवाहू वाहनाचा दरवाजा तोडून चालक अशोक रोकडे यास बाहेर काढले. तसेच ताब्यात असलेल्या शासकीय वाहनातून तत्काळ देवकर रुग्णालयात दाखल केले.
अपघातावेळी बांभोरी येथील नागरिक जळगावकडे येत असतांना त्यांनी अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वार पंढरी नन्नवरे यांना ओळखले. व तत्काळ रिक्षातून शहरातील अपेक्स या रुग्णालयात दाखल केले. त्यांचीही प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरु आहेत. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहने महामार्गावरुन बाजूला केले. तसेच वाहने सुरळीत केली. याप्रकरणी तालुका पोलिसांनी ट्रकसह चालक तसेच क्लिनरला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.