अहमदाबादेत ‘नमस्ते’ आणि दिल्लीत आगडोंब ! : शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

 

मुंबई प्रतिनिधी । डोनॉल्ड ट्रंप यांचा दौरा आणि दिल्लीतील हिंसाचारावर भाष्य करतांना शिवसेनेने अहमदाबादेत नमस्ते आणि दिल्लीत आगडोंब कशासाठी हा प्रश्‍न उपस्थित करून भाजपवर टीका केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, दिल्लीत सध्या हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे, लोक रस्त्यांवर काठया, तलवारी, रिव्हॉल्व्हर घेऊन उतरले आहेत, रक्ताचे सडे पडत आहेत. एखाद्या भयपटाचे चित्र सध्या दिल्लीत दिसत आहे, ते १९८४ च्या दंगलीचीच भयाण वास्तवता दाखवणारे आहे. दिल्लीतील सध्याच्या दंगलीस जबाबदार कोण? हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व आपले पंतप्रधान मोदी यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत असताना त्यांच्या डोळ्यांसमोर हा असा रक्तपात व्हावा हे दृष्य काही चांगले नाही. दिल्ली विधानसभा निवडणूक आटोपल्यावर हिंसाचार उसळला आहे हे रहस्यमय आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला व आता दिल्लीची ही अशी दशा झाली आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, सीएए समर्थक आणि विरोधक समोरासमोर आल्याने दिल्लीत हिंसाचार भडकला. दोन्ही बाजूने हल्ले झाले. पोलिसांवर हल्ले झाले हे चिंताजनक आहे. या दंगलीचा फायदा समाजकंटक व देशविरोधी घटक घेत आहेत व ट्रम्प यांच्या दौर्‍यादरम्यान असा हिंसाचार घडावा आणि त्यातून देशाची प्रतिमा मलीन व्हावी यासाठी दंगलीचे कारस्थान रचले आहे असे गृहमंत्रालय म्हणत आहे, पण असे कारस्थान रचले व रटारटा शिजले हे गृहमंत्रालयास समजू नये हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. पोलीस मारले गेले आहेत, त्याहीपेक्षा गंभीर बाब अशी की, दिल्लीत लष्कराला पाचारण केल्याचे वृत्त आले व लष्करी वेशातील लोक दंगलग्रस्त भागात तैनात असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. लष्करी पोशाखातील शेकडो जवानांचे संचलन जाफराबाद परिसरात झाले, पण हे आमचे लष्कर नाही असा खुलासा लष्कराच्या अधिकृत प्रवक्त्याने केला. मग दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण? याआधी बुरखा वगैरे घालून भाजपची एक कार्यकर्ती शाहीनबाग आंदोलकांच्या गर्दीत घुसली होती. त्यामुळे नक्की कोण कोणाच्या पोशाखात व मुखवटयात फिरत आहेत ते समजायला मार्ग नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे दिल्लीतील स्वागत दंगलीच्या आगडोंबाने, रस्त्यावरील रक्ताच्या सडयाने, आक्रोश, किंकाळ्या, अश्रुधुरांच्या नळकाडयांनी, दिल्लीतील या भयपटाने व्हावे हे बरे नाही. ट्रम्पसाहेब हे प्रेमाचा संदेश घेऊन दिल्लीत आले, पण त्यांच्या समोर हे काय घडले? अहमदाबादमध्ये नमस्ते आणि दिल्लीत आगडोंब! दिल्लीची इतकी बदनामी याआधी कधीच झाली नव्हती असे यात म्हटले आहे.

Protected Content