अहमदनगर जिल्ह्यात एका दिवसात धक्कादायक कोरोना रुग्णवाढ !

 

नगर: वृत्तसंस्था ।  कडक निर्बंधांनंतर हजाराच्या आत आलेली जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या निर्बंध शिथील होताच  वाढली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १ हजार ३२६ नवे कोरोना बाधित रुग्ण दाखल झाले आहेत.

 

सहा तालुक्यांनी पुन्हा रुग्णसंख्येची शंभरी ओलांडली आहे. दुसरीकडे आणखी काही दुकाने आणि व्यवहार सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी राजकीय पक्ष आणि व्यापारी संघटनांकडून जोरदार मागणी सुरू आहे.

 

संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत अहमदनगर शहर आणि जिल्ह्यालाही मोठा फटका बसला. एप्रिलमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या साडेचार हजारांच्या पुढे गेली होती. त्यानंतर कडक निर्बंध लागू केल्यानंतर हळूहळू आकडे कमी होत गेले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या आत आली होती. सलग दोन-तीन दिवस आकडे कमालीचे कमी झाल्याचे पहायला मिळाले. याशिवाय शहरासोबतच ग्रामीण भागातही रुग्णसंख्या कमी झाली. जवळपास सर्वच तालुक्यांत नव्या रुग्णांची संख्या दोन अंकी झाली होती.

 

१ जूनपासून निर्बंध शिथील करण्यात आले. त्यानंतर कालच सुधारित आदेश काढून कृषी उत्पन्न बाजार समिती व आणखी काही व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. दोन महिन्यांनंतर व्यवहार सुरळीत होत असताना ठिकठिकाणी पुन्हा गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. आज जाहीर झालेल्या आकडेवारीत जिल्ह्यातील रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. एकूण १ हजार ३२६ नव्या रुग्णांची नोंद झाली. संगमनेर, जामखेड, नगर ग्रामीण, पारनेर, श्रीगोंदा, अकोले या तालुक्यातील दैनंदिन रुग्ण संख्या पुन्हा शंभरच्या वर गेली आहे. निर्बंध शिथील केल्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. नगर शहरात मात्र रुग्णसंख्या तुलनेत कमीच आहे. गेला महिनाभर नगर शहरातील अत्यावश्यक सेवा बंद होत्या. त्या आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. ग्रामीण भागात मात्र अनेक तालुक्यांत नव्या रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.

 

 

पालकमंत्री हसन मुश्रीफ अनेक दिवसानंतर शनिवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत  उपाययोजांचा आढावा घेण्यात येऊन निर्बंध आणखी शिथील करायचे किंवा कसे, यासंबंधी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

 

Protected Content