नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतात कोरोनामुळं मृत्यूचे प्रमाण जगभरातील सर्वाधिक कमी म्हणजे दोन टक्क्यांहूनही कमी आहे. यामागे भारतीयांची अस्वच्छतेची सवयच कारणीभूत असल्याचे एका अभ्यासून समोर आलं आहे !
कोरोनाशी लढण्यासाठीची प्रतिकारशक्ती भारतीयांना अस्वच्छतेच्या सवयीतूनच तयार झाल्याचा दावा या अभ्यातून करण्यात आला आहे.
भारत हा जगातील दुसरा सर्वाधिक कोरोना संसर्गाचा फटका बसलेला देश ठरला आहे. आपल्यापुढे आता केवळ अमेरिका हाच देश आहे. एकट्या भारतात जगभरातील एक षष्ठांश कोरोना रुग्ण आहेत.
पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सेल सायन्सेस आणि चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी भारतीयांच्या कोविडशी लढण्याच्या प्रतिकारशक्तीबाबत संशोधन केलं असून ते संशोधन पत्रिकांमधून प्रसिद्ध केलं आहे.
या अभ्यासानुसार, स्वच्छतेबाबतचा निष्काळजीपणा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे कमी प्रमाण आणि अस्वच्छ परिसर अशा परिस्थितीत भारतीय बऱ्याच काळापासून राहत असल्याने हीच बाब त्यांना महामारी असलेल्या कोविड-१९ आजारापासून दूर ठेवत आहे. त्याचबरोबर इतरही संशोधनांमधून ही बाब समोर आली आहे की, ज्या देशातील लोक कमी आणि मध्यम स्वरुपाच्या पगारांवर काम करतात त्यांच्यामध्ये कोविडशी लढण्याची प्रतिकारशक्ती जास्त आहे.
संशोधकांनी १०६ देशांच्या सार्वजनिक स्वरुपात उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे हा दावा केला आहे. यासाठी त्यांनी २४ निकष लावले आहेत. यामध्ये लोकसंख्येची घनता, विशिष्ट जनसंख्येचे प्रमाण आणि स्वच्छतेचा दर्जा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर यामध्ये ही गोष्ट सुद्धा आढळून आली आहे की, उच्च पगार असलेल्या देशांमध्ये मध्यम आणि कमी पगार असलेल्या देशांच्या तुलनेत कोरोनाचा मृत्यूदर जास्त आहे. या देशांमध्ये आपोआपच मोठ्या आजारांबाबत प्रतिकारशक्ती तयार झाली आहे. जसं टाईप १ मधुमेह, सोरायसिस आणि दमा.
प्रत्येक दहा लाख लोकांमध्ये उच्चभ्रू आणि चांगला जीडीपी असलेल्या देशांतील कोरोना मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे तर कमी जीडीपी असलेल्या देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे मत एनसीसीएमचे माजी संचालक आणि या संशोधन पत्रांचे सहलेखक असलेल्या शेखर मांडे नोंदवले आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, कांग्रा या कॉलेजने १२२ देशांतील माहितीच्या आधारे हा दावा केला आहे की, अस्वच्छताच अनेक आजारांना प्रतिबंध करते.