अशोक गेहलोत होणार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष?

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । राहुल यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्यास ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे देण्याचं काँग्रेसमध्ये घटत आहे, असं सूत्रांनी सांगितलं

काँग्रेस अंतर्गत वाद आणि रखडलेली पक्षाध्यक्षाची निवड या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस कार्य समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या दीड वर्षांपासून काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचा तिढा सुटताना दिसत नाही. त्यातच राहुल गांधी यांनीही पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधील एका गटाने अशोक गेहलोत यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवावीत असा पवित्रा घेतला आहे. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी हे पद स्वीकारावं किंवा अन्य कुणाकडे हे पद सोपवावं, असं या नेत्यांचं म्हणणं आहे. या नेत्यांना सध्या तरी अशोक गेहलोत हेच उत्तम पर्याय दिसत आहेत.

अशोक गेहलोत हे गांधी कुटुंबाच्या अत्यंत जवळचे असल्याचं मानलं जातं. सोनिया गांधी यांचे विश्वासू सहकाऱ्यांपैकी गेहलोत एक आहेत. राजस्थानात काँग्रेसच्या विजयानंतर राहुल गांधी यांनी सचिन पायलट ऐवजी गेहलोत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिल्याने गेहलोत हे गांधी कुटुंबाच्या अत्यंत जवळचे असल्याचं तेव्हाच सिद्ध झालं होतं. गेहलोत अनुभवी आणि अभ्यासू नेते आहेत. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेले आणि कुशल संघटक असलेले नेते म्हणूनही गेहलोत यांची ख्याती आहे. शिवाय नव्या आणि जुन्या नेत्यांमध्ये समन्वय साधून काम करण्याची त्यांची हातोटी सर्वश्रूत असल्याने सध्या काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

गेहलोत यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे आताही गेहलोत अध्यक्षपदाचा प्रस्ताव स्वीकारतील की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, चर्चा काहीही असली तरी सध्या तरी गेहलोत मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या कामात गुंतलेले आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील वाद उफाळून आला होता. ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पक्ष नेतृत्वावरच बोट ठेवलं होतं. दुसरीकडे पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांनीही पराभवावर चिंतन करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यावेळी गेहलोत यांनी सिब्बल यांना टोले लगावले होते. पक्षातील अंतर्गत वादावर सार्वजनिकरित्या चर्चा करण्याची गरज नाही. नेतृत्वावर विश्वास ठेवा, असा सल्ला गेहलोत यांनी सिब्बल यांना दिला होता.

Protected Content