जळगाव, प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी २७ जून रोजी जळगाव एमआयडीसीमध्ये ७० ब्रास अवैध वाळू साठा असल्याची तक्रार केली होती, या तक्रारीनुसार चौकशी केली असता दोघांकडून १७ लाख २३ हजार ८०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
दीपककुमार गुप्ता यांना चेतन कृष्णा पाटील व अनिल चंद्रभान पाटील यांच्या मालकीच्या जळगाव एमआयडीसी परिसरातील मे. सी. के. प्रोडक्ट्स प्लॉट नं. डी ३४ या ठिकाणी २७ जून रोजी ७० ते ८० ब्रास वाळू साठा आढळून आला होता. याबाबत श्री. गुप्ता यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. यानुसार मेहरूण तलाठी यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला होता. यात चेतन कृष्णा पाटील व अनिल चंद्रभान पाटील यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी नोटीसीला समाधानकारक खुलासा सादर न केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यानुसार चेतन कृष्णा पाटील व अनिल चंद्रभान पाटील यांना १७ लाख २३ हजार ८०० रुपयांचा दंड करण्यात आला असून त्यांनी या दंडाची रक्कम शासकीय खात्यात भरली आहे.