तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था । केरळमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल ३८ जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचं धक्कादायक प्रकरण पुढे आलं आहे. येथील १७ वर्षीय अल्पवयीन पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात तिच्यासोबत हे घडलं .
निर्भया केंद्रात या मुलीचं काऊंसलिंग सेशन सुरु होतं, त्यादरम्यान तिने ३८ जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली, असं पोलिसांनी सांगितलं.
पीडितेसोबत लैंगिक अत्याचाराची पहिली घटना ही २०१६ मध्ये झाली होती. तेव्हा ती फक्त १३ वर्षांची होती. त्यानंतर एका वर्षानंतर पुन्हा तिच्यासोबत हे राक्षसी कृत्य घडलं. दुसऱ्या घटनेनंतर तिला बाल गृहात पाठवण्यात आलं. त्यामनंतर जवळपास वर्षभरानंतर तिला तिच्या आई आणि भावासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली.
पोलीस निरिक्षक मोहम्मद हनिफा यांनी सांगितलं, “बाल गृहातून निघाल्यानंतर पीडिता काही काळापर्यंत बेपत्ता होती. गेल्या डिसेंबरमध्ये ती पलक्कडमध्ये असल्याची माहिती मिळाली. तेथून तिला निर्भया केंद्रात आणण्यात आलं”. काऊंसलिंग सेशन दरम्यान पीडितेने लैंगिक अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनांची माहिती दिली
३८ नराधमांविरोधात लैंगिक शोषणासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर यापैकी ३३ आरोपींना अटकही करण्यात आली आहे. सध्या अटकेत असलेले सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. ‘समितीने वर्षभरापूर्वी अल्पवयीन मुलीला बाहेर पाठवण्यापूर्वी सर्व कायदे आणि सुरक्षा नियमांचं पालन करत निर्णय घेतला होता’, अशी माहिती मलाप्पुरम बाल कल्याण समितीचे अध्यक्ष शाजेश भास्कर यांनी दिली.