अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणार्‍या तरुणास सुनावली ३ वर्ष कारावासाची शिक्षा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या तरूणास तीन वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस. जी. ठुबे यांनी हा निकाल दिला.

 

जळगाव तालुक्यातील एका गावात २३ सप्टेंबर २०१४ रोजी १७ वषीय अल्पवयीन मुलीला पकडून संशयित तरुणाने तिची ओढणी ओढली होती. व अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून तरुणाविरुध्द एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायमुर्ती एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.यात तपासाधिकारी पोलिस उपनिरीक्षक व इतर साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. साक्ष व पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने संशयित तरुणास दोषी धरले. गुरुवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी या खटल्यात निकालात कामकाज झाले. त्यात न्यायमुर्ती ठुबे यांनी तरूणास पोक्सो कलमान्वये ३ वर्षे कैद व ५ हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या रकमेतून चार हजार रूपये पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वैशाली महाजन यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी यांनी सहकार्य केले.

Protected Content