अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना मध्यप्रदेशातून अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तीला इंदूर (मध्यप्रदेश) येथे पळवून नेणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी ९.३० वाजता ताब्यात घेतले. त्यांनी ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुलीचे अपहरण केले होते.

प्रकाश रतन बावस्कर (वय २२) व गणेश सुनील राणे (वय १९, दोघे रा. कोल्हाडी, ता. बोदवड) असे अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. या दोघांनी गावातच राहणाऱ्या पुजा (नाव बदललेले) या १३ वर्षीय तरुणीचे अपहरण केले होते.

घटना अशी की, पुजा, प्रकाश व गणेश हे तीघे एकाच गावात राहणारे व परिचीत होते. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी कोल्हाडी शिवारातील प्रमोद ढाके यांच्या शेतात प्रकाश व पुजा यांची भेट झाली. यानंतर काही वेळातच प्रकाशने स्वत:ची दुचाकी आणून याच दुचाकीवरुन त्याने पुजाला पळवुन नेले. यावेळी त्यांच्या सोबत गणेश देखील आला. गणेश याने बोदवड शहराच्या बाहेर एका पेट्रोल पंपवर दुचाकीत पेट्रोल भरले. यावेळी कोल्हाडी गावातील काही लोकांनी तीघांना पाहिले होते. यानंतर याच दुचाकीने ते रात्रभरातून थेट इंदूर (मध्यप्रदेश) येथे निघुन गेले. इकडे कोल्हाडी गावात पुजाच्या कुटुंबीयांनी तीचा शोध सुरू केला. ती मिळुन न आल्यामुळे बोदवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुजा अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मंुढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास सोपवला. दोन पथक तयार केली. एक पथक प्रकाशचा एक मित्र दौंड (ता. अहमदनगर) येथे असल्याने तो तीकडे पळुन जाण्याची शक्यता होती. त्यानुसार एका पथक दौंडला रवाना झाले. तर पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, उपनिरीक्षक रवींद्र गीरासे, राजेंद्र पाटील, कमलाकर बागुल, दीपक पाटील, विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, अनिल देशमुख यांच्या पथकाने गणेश राणे याचे लोकेशन ट्रेस केले. त्यानुसार या पथकाने थेट इंदूर गाठुन प्रकाशसह तीघांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी दोघांना बोदवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content