नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये देशातील केवळ एक टक्का लोकांचाच विचार करण्यात आला आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, “मला बजेटकडून अपेक्षा होती की सरकार देशातील ९९ टक्के लोकसंख्येच्या पाठीशी उभं असेल. मात्र, हे बजेट केवळ एक टक्का लोकांसाठीच आहे. सरकारनं लहान आणि मध्यम उद्योग, कामगारा, शेतकरी आणि संरक्षण खात्याचा निधी काढून तो पाच-दहा लोकांच्या खिशात टाकला आहे”
“तुम्ही सांगितलं होतं की, खासगीकरण हे सर्वसाधारण लोकांच्या फायद्याचं असेल. त्यानुसार या लोकांच्या हातात पैसा ठेवणं गरजेचं होतं. कारण जर आपल्याला अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करायची असेल तर ती केवळ उपभोग्य बाजूनेच सुरु होईल, पुरवठा बाजूने ते शक्य नाही,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दिल्लीला चहुबाजूंनी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. या लोकांनी आपल्याला जगवलं आहे, मग तरीही दिल्ली एखाद्या तटबंदीमध्ये का रुपांतरीत झाली आहे? आपण शेतकऱ्यांना धमकावत, मारत का आहोत? त्यांचा जीव का घेत आहोत? सरकार त्यांच्याशी चर्चा का करत नाही? त्यांच्या समस्या का सोडवत नाही? ही समस्या देशासाठीही चांगली नाही, अशा शब्दांत राहुल गांधींनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं.
राहुल गांधी सरकारला उद्देशून म्हणाले, चीनने भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि आपली जमीन बळकावली. यानंतर तुम्ही चीनला काय संदेश दिला? त्यावेळी आपण आपला संरक्षण खर्च वाढवला नाही. आता तुम्ही हा खर्च ३,००० ते ४,००० कोटी रुपयांची वाढवला, यातून तुम्ही काय संदेश दिला? याचा अर्थ असाच होतो की, तुम्ही भारतीय हद्द ओलांडा आणि तुम्हाला काय करायचं ते करा. आम्ही आमच्या संरक्षण दलांना पाठिंबा देणार नाही.