अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करणारा अर्थसंकल्प-मोदी

नवी दिल्ली । निर्मला सीतारामण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात व्हिजन आणि अ‍ॅक्शन दोन्ही असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर देशवासियांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. ते म्हणाले की, शेतकर्‍यांचं उत्पन्न दुप्पट करण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. तरुणांना नव्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामीण रोजगार क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं कामही या अर्थसंकल्पातून करण्यात आलं आहे. अर्थमंत्र्यांनी सुचविलेल्या बदलांद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल आणि देशाचा प्रत्येक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदतच होणार आहे. शेतकर्‍यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष्य या अर्थसंकल्पात ठेवण्यात आलं आहेच, शिवाय शेतकर्‍यांसाठी १६ कलमी कार्यक्रमही लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रात रोजगाराची निर्मिती होण्यास मदत होणार आहे. कृषी, पायाभूत सुविधा, टेक्सटाइल आणि तंत्रज्ञान यात रोजगार मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे रोजगार वाढवण्यासाठी या चारही क्षेत्रावर अर्थसंकल्पात जोर देण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Protected Content