अरे देवा….जळगावातून ८० संशयितांचे स्वॅब सँपलच गायब !

जळगाव प्रतिनिधी । प्रशासनाच्या अनास्थेमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप भयावह पातळीवर वाढल्याचे स्पष्ट झाले असतांना आता चक्क ८० रूग्णांचे स्वॅब सँपलच गायब झाल्याची माहिती समोर आल्याने प्रशासनाच्या गलथानपणाबाबत संताप व्यक्त होत आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज जळगावात आढावा बैठक घेण्यात आली. यात लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले. याप्रसंगी सिव्हील सर्जन यांनी जिल्हा कोविड रूग्णालयातील ८० रूग्णांचे स्वॅब सँपल गहाळ झाल्याची माहिती दिल्याने उपस्थिती लोकप्रतिनिधी व अधिकारी स्तब्ध झाले. हे रूग्ण सध्या कोविड सेंटरमध्ये क्वॉरंटाईन असून त्यांचे स्वॅब सँपल नेमके कोणत्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले याची माहितीच नसल्याची कबुली त्यांनी दिली. माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी यावरून प्रशासनावर टिकेची झोड उठविली आहे. यामुळे प्रशासनाचा गलथानपणा पुन्हा एकदा समोर आला असून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर जिल्हा शल्य चिकित्सकांनी हे सर्व ८० रिपोर्ट धुळे येथे पाठविण्यात आले असून याचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली आहे.

Protected Content