नवी दिल्ली वृत्तसंस्था । अश्लील छायाचित्रे आणि फक्त पाच हजार रूपयांसाठी जवान सोमवीर याने देशाशी गद्दारी केल्याची धक्कादायक माहिती तपासामधून समोर आली आहे.
भारतीय जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकारात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. हाय हॅलोच्या माध्यमातून जवान सोमवीर आणि पाकिस्तानी महिला एजंटमध्ये चर्चेला सुरुवात झाली होती. या महिलेने सोमवीरला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी काही अश्लील छायाचित्रे पाठवली होती. त्याबदल्यात या जवानाने लष्कराशी संबंधित माहिती, टँक, हत्यारबंद वाहने, हत्यारे आणि लष्करी कंपन्यांच्या स्थितीबाबतची माहिती या महिलेला पुरवली. यानंतर या महिलेने त्याला पाच हजार रुपयेही दिले. दरम्यान, याच प्रकारे लष्करातील अनेक जवानांना जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून गोपनीय माहिती जमा करण्यात आल्याची शक्यतादेखील समोर आली असून या दिशेने आता तपास करण्यात येत आहे.