वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अमेरिेकेत कोरोनाचे थैमान थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. एकाच दिवसात दोन लाख १० हजार नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. अमेरिकेत संसर्ग सुरू झाल्यानंतर एकाच दिवसात आढळलेल्या कोरोनाबाधितांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.
जगभरात अमेरिकेत सर्वाधिक करोनाबाधित आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने ही माहिती दिली. गुरुवारी मागील २४ तासांत दोन लाख १० हजार नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. दोन हजार ९०७ जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत बाधितांची एकूण संख्या एक कोटी ४० लाख झाली आहे. मृतांची संख्या दोन लाख ५० हजारांहून अधिक झाली आहे.
अमेरिका, भारत आणि ब्राझील या देशांमध्ये सर्वाधिक संसर्ग फैलावला आहे. भारतात बाधितांची संख्या ९५ लाखांहून अधिक झाली असून एक लाख ३८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात ८९ लाखांहून अधिकजणांनी संसर्गावर मात केली आहे.
अमेरिकेत ११ किंवा १२ डिसेंबरपासून लस उपलब्ध होण्यास सुरुवात होईल असे संकेत व्हाइट हाउसमधून देण्यात आले आहेत. नाताळापूर्वीच अमेरिकेत दोन लशींचा वापर सुरू होण्याची शक्यता आहे.