अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षाच्या भाचीकडूनही आंदोलक शेतकऱ्यांचे समर्थन

 

वाशिंग्टन : वृत्तसंस्था । भारतातील शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. पॉपस्टार रिहानानं ट्विट केल्यानंतर सेलिब्रेटी आंदोलनाच्या समर्थनार्थ बोलत आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस हिने सर्वांना याविरुद्ध आवाज उठवण्याचं आवानही केलं आहे.

कृषी कायद्यांवरून केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असं चित्र सध्या दिल्लीत निर्माण झालं आहे. शेतकरी आंदोलनाला धार आल्यानंतर दिल्लीच्या सीमांना युद्धभूमीचं स्वरूप आलं असून, शेतकऱ्यांच्या नाकेबंदीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत. याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागले आहेत. कमला हॅरिस यांची भाची मीना हरिस हिने ट्विट करत शेतकरी आंदोलनावर भूमिका मांडली आहे.

“हा केवळ योगायोग नाही की, जगातील सर्वात जुन्या लोकशाहीवर एका महिन्यापूर्वी हल्ला झाला. आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली लोकशाही संकटात आहे. हे एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. भारतात शेतकरी आंदोलकांविरुद्ध पोलिसांचा वापर आणि इंटरनेटवर बंदीविरुद्ध आपल्या सर्वांनी आवाज उठवायला हवा,” असं ट्विट मीना हॅरिस यांनी केलं आहे. मीना हॅरिस हिने पॉपस्टार रिहानाने केलेलं ट्विटही रिट्विट केलं आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल पॉपस्टार रिहानानं ट्विट केलं होतं. आपण शेतकरी आंदोलनाविषयी बोलत का नाहीत?, असा सवाल तिने ट्विटद्वारे केला होता. त्यानंतर पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनं आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. “भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत,” असं ग्रेटाने म्हटलं होतं.

Protected Content