जळगाव, प्रतिनिधी । शहरात रस्ते तयार तयार करण्यासाठी मनपा प्रशासनाची तयारी आहे परंतु नोव्हेंबर २०१७ मध्ये सुरू झालेले अमृत योजनेचे काम मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. शासनाने कामात तांत्रिक सल्लागार म्हणून मजीप्राची नेमणूक केली होती. तसेच त्यानंतर मलनिस्सारण योजनेच्या कामाला देखील सुरुवात झाली. अमृतच्या मक्तेदाराच्या नियोजनाअभावी अनेक परिसरातील काम अपूर्ण राहिले, कदाचित मनुष्यबळ अपूर्ण असल्याने हा प्रकार झाला असावा परंतु काम पूर्ण नसल्याने रस्त्यांची डागडुजी आणि नळ जोडण्या देखील अपूर्ण राहिल्या आहेत. शहरात अनेक वर्षापासून रस्त्यांची कामे झाली नसून मनपाने ४१ कोटींचे रस्ते प्रस्तावित केले आहेत, परंतु शासनाच्या ११ मे २०१७ च्या आदेशामुळे रस्त्यांचे काम सुरू होऊ शकत नसल्याची खंत महापौर भारती सोनवणे यांनी व्यक्त केली तसेच ज्या-ज्या प्रभागात दोन्ही योजनांची कामे पूर्ण होतील त्याठिकाणी रस्त्यांच्या कामाला सुरुवात होईल असे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.
शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेता मंगळवारी महापौरांनी आपल्या दालनात त्यांनी अधिकाऱ्यांकडून याबाबत आढावा घेतला. यावेळी भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी, नगरसेवक कैलास सोनवणे, गटनेते भगत बालाणी, सभागृह नेते ललित कोल्हे, नगरसेवक विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते.
महापौर सौ.भारती सोनवणे म्हणाल्या की, सध्या शहरातील अनेक भागात अमृत योजनेचे काम अपूर्ण असल्याने मक्तेदाराला मार्च २०२१ पर्यंतची मुदत देण्यात आली असून त्याबाबतचा सुधारित बार चार्ट देखील त्याने मनपाला दिला आहे. अमृतच्या कामाची संपूर्ण देखरेख मनपाकडे नव्हती तर त्यात तांत्रिक सल्ला, मार्गदर्शन आणि शिफारसकामी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा देखील सहभाग होता. बऱ्याच वेळा समन्वय राखला जात नसल्याने कामाला विलंब होत होता. सध्या अंशतः लॉकडाऊन काळात शनिवार आणि रविवारी देखील काम करण्याची परवानगी मक्तेदाराने मागितली असून ती त्यास देण्यात आली आहे. तसेच मनपा अभियंत्यांचे देखील सुट्टीच्या दिवशी सहकार्य राहणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
रस्त्यांची डागडुजी लवकरच होणार
शहरातील अमृत योजनेच्या कामाला गती आली असून मार्च २०२१ पर्यंत काम पूर्ण होईल. दरम्यान, पाऊस कमी झाल्यानंतर लागलीच अमृतचे खड्डे आणि चाऱ्या बुजविण्याबाबत मक्तेदाराला सूचना दिलेल्या आहे अशी माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली.
डांबरी रस्त्यांची ४१ कोटींची कामे प्रस्तावित
शहरातील रस्ते फारच खराब झाले असून गेल्या काही वर्षापासून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आलेली नाही. शहरातील अमृत योजना आणि मल निस्सारण योजनेची कामे पूर्ण केल्यानंतर हाती घेण्यासाठी ४१ कोटींची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहे. उद्या होणाऱ्या महासभेसमोर याबाबत वाढीव कामांचा प्रस्ताव देखील मांडण्यात येणार आहे. ज्या-ज्या प्रभागात दोन्ही योजनांची कामे पूर्ण होतील त्याठिकाणी रस्त्यांची कामे सुरू होतील अशी माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली आहे.
असा आहे शासन आदेश
शासनाने दि.११ मे २०१७ रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशानुसार राज्यात महाराष्ट्र राज्य नगरोत्थान अभियान, अमृत योजना, मल निस्सारण योजनेची अनेक शहरात कामे सुरू आहेत. शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की अगोदर रस्ते बांधले जातात आणि या योजनेच्या कामामुळे ते पुन्हा खोदण्यात येतात त्यानंतर रस्ते बांधकामासाठी शासनाकडे निधीची मागणी होते. हा अपव्यय टाळण्यासाठी शासनाने निर्देश दिले असून अमृत योजना, पाणी पुरवठा योजना, मल निस्सारण योजनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय रस्त्यांची कामे करण्यात येऊ नये असे शासनाने स्पष्ट केले आहे.
अमृतच्या कामाची अशी आहे स्थिती
शहरात दि.२० सप्टेंबरपर्यंत एचडीपी पाईपलाईनचे काम ५८६ पैकी ४३० किमी ७५%, डीआय मोठी पाईपलाईन १७ पैकी ११ किमी ६५%, डीआय डिस्ट्रिब्युटर पाईपलाईन ५८ पैकी ३७ किमी ७०%, पाईपलाईन तपासणी ५८६ पैकी २९५ किमी ५२%, भूमिगत टाक्या, पंप हाऊस ९०%, उंच पाणी टाक्या ५०%, नळ जोडणी देण्याचे काम ३०% पूर्ण झालेले आहे. दरम्यान, लॉकडाऊन आणि कामाला झालेला विलंब लक्षात घेता जे अधिकृत नळधारक आहेत, ज्यांच्याकडे २-३ वर्ष जुन्या पावत्या आहेत अशा सर्वांना जोडणी देण्याचे निर्देश मनपा प्रशासनाने मक्तेदाराला दिलेले आहेत. तसेच शहरात मल निस्सारण योजनेचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू असून ते देखील लवकरच पूर्णत्वास येईल.