कोलकाता : वृत्तसंस्था । अमित शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोना पसरतोय अशी टीका आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली
शेतकरी नेते राकेश टिकैत सध्या पश्चिम बंगालमध्ये असून त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनाचं स्वरुप, बंगालमधल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या विषयांवर चर्चा झाली. पत्रकारांशी बोलताना टिकैत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.
जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून कोरोना पसरत नाही का? त्यावेळी टिकैत म्हणाले, आम्ही कुठलीही मोठी बैठक घेत नाही, ज्याने कोरोना पसरु शकतो. आम्ही सगळेजण कोरोना नियमांचं पालन करुन आंदोलन करत आहोत. पश्चिम बंगाल निवडणुकांच्या वेळी कोरोनाचा भरपूर प्रसार झालेला असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि अमित शाह यांच्या बैठका झाल्या आणि त्यामुळे कोरोना अजूनच पसरला.
टिकैत यांनी पत्रकारांनाच विचारलं, जेव्हा बंगालमध्ये केंद्र सरकार स्वतः प्रचार करत होतं तेव्हा कोरोना पसरत नव्हता का? ममता बॅनर्जी नंदिग्राममधून निवडणूक लढत आहे हेही आपल्याला माहित नव्हतं असं टिकैत यांनी सांगितलं.
तुम्हीही ममता यांच्या प्रचारात सहभागी होता असं विचारल्यावर टिकैत म्हणाले, आम्ही प्रचार केला म्हणूनच आम्ही त्यांच्यासमोर आमच्या मागण्या मांडत आहोत. आम्हाला असं वाटत आहे की विरोधी पक्षांनी आमच्या सोबत यावं आणि केंद्र सरकारवर शेतकरी कायद्यासंदर्भात दबाव टाकावा