नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी जम्मू काश्मीर प्रदेश काँग्रेसच्या गुपकार घोषणापत्र आघाडीत सहभागी झालेल्या नेत्यांवर टीकास्र सोडलं. यावर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ता यांनी कडक प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
‘मी आदरणीय गृहमंत्र्यांच्या या हल्ल्यामागचा राग समजू शकतो. त्यांना सांगण्यात आलं होतं की पीपल्स अलायन्स निवडणुकीचा बहिष्कार करण्याची तयारी करत आहे. असं घडलं असतं तर भाजपला जम्मू-काश्मीरमध्ये मनमानी करण्याची सूट मिळाली असती. पण आम्ही मात्र त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतलेला नाही. केवळ जम्मू काश्मीरमधल्या नेत्यांनाच लोकशाही प्रक्रियेत आणि निवडणुकांत भाग घेण्यासाठी ‘देशद्रोही’ म्हटलं जाऊ शकतं. खरं म्हणजे, जो कुणी भाजपच्या विचारधारेचा विरोध करतो, त्याला भ्रष्ट आणि देशद्रोही असल्याचं लेबल चिटकवलं जातं’ असं म्हणत उमर अब्दुल्ला यांनी गृहमंत्र्यांना प्रत्यूत्तर दिलंय.
‘आम्ही कोणतीही गँग नव्हे अमित शहाजी, आम्ही वैध पद्धतीनं बांधले गेलेलो महाआघाडी आहोत, जे निवडणुकांत सहभागी होत आलेत आणि निवडणुका लढत राहतील. यामुळेच तुम्हाच्या निराशेत भर पडतेय’ असं म्हणत उमर अब्दुल्ला यांनी रोष व्यक्त केला.
दुसरीकडे पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनीही गृहमंत्री अमित शहांवर पलटवार केलाय. ‘सत्तेच्या भुकलेल्या भाजप कितीही आघाड्या करो पण आम्ही एक युनायटेड फ्रंट उभारला तर आम्ही राष्ट्रहिताला आव्हान देत आहोत’ असं म्हणत त्यांनी उपरोधिक टीका केलीय. भाजप गुपकार गटाला देशद्रोही म्हणून हिणवत आहे तसंच खुद्द भाजपकडूनच दररोज संविधानाच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत, असंही महबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.