नगर: वृत्तसंस्था । कार्यक्रमांमध्ये व्यग्र असतानाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर डॉ. विखे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली.
मात्र, ‘आपली ही भेट वेगळ्या कारणासाठी होती, राज्यातील हालचाली जाणून घेण्यासाठी वरिष्ठ नेते भेटत असतात,’ असे विधान करून डॉ. विखे यांनी याचे गूढ अधिकच वाढविले आहे. या भेटीत विखे पिता-पुत्रांनी राज्याबद्दल काय माहिती दिली असेल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
खासदार डॉ. विखे आज पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी नगरला आले होते. यापुढे आपण पक्ष संघटनेसाठी अधिक वेळ द्यायचे ठरविले आहे. आजपासून ही नवी सुरुवात करीत आहोत. पक्षाच्या जिल्हा कार्यालयासाठीही जागा शोधण्यात येत आहे, असे त्यांनी कार्यक्रमात सांगितले.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शहा यांच्या भेटीचा आणि मंत्रिपदाचा विषय निघाला. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन, पश्चिम बंगालचा दौरा अशा व्यग्र दिनक्रमातही शहा यांनी विखे पिता-पुत्रांना भेटीसाठी वेळ दिली होती. त्यामुळे या भेटीबद्दल उत्सुकता निर्माण झाली
त्यावर डॉ. विखे म्हणाले, ‘आपण कार्यकर्त्यांच्या मनातील मंत्री आहोत. त्यामुळे आपल्याला पदाची चिंता नाही. पक्षाच्या माध्यमातून काम करीत राहणे हीच आपली भूमिका आहे. दिल्लीत शहा यांची भेट ही वेगळ्या कारणांसाठी होती. अशा चर्चा उघड करता येत नसतात. राज्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी, सरकारचे काय चालले आहे, आपल्या पक्षाचे काम जाणून घेणे, पुढची धोरणे आखण्यासाठी मुद्दे जाणून घेणे यासाठी पक्षश्रेष्ठी बोलावत असतात. तेव्हा आपण येथे राज्यात जे पाहिले, जे वाटते हे वरिष्ठांना सांगणे आपले काम असते. बाकीचे निर्णय त्यांनी घ्यायचे असतात,’ असे डॉ. विखे म्हणाले.
कोरोनासंबंधी बोलताना डॉ. विखे म्हणाले, कोरोनाच्या उपाययोजनांचा विनाकारण बाऊ करता कामा नये. उगीच भीती निर्माण न करता लोकांना आता सुखाने जगू द्या. लोक आता याला कंटाळले आहेत. काय काळजी घ्यायची, हे लोकांना कळाले आहे. त्यानुसार आपल्या परीने ते ती घेत आहेत. रात्रीची संचारबंदी वगैरे तात्पुरत्या उपायांचा काही फरक पडणार नाही. उलट आता लोक हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. याहीपुढे जाऊन लोकांचा लसीवरही अद्याप विश्वास बसलेला नाही. लोकांच्या मनात त्याबद्दल गोंधळ आहे, तसा तो सरकारच्या नियोजनातही आहे,’ असेही डॉ. विखे म्हणाले.