अमरावती | येथे भडकलेल्या हिंसाचारानंतर आता परिस्थिती बर्याच प्रमाणात निवळली असून आज संचारबंदीमध्ये चार तासांची शिथीलता देण्यात आली आहे.
त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला अमरावतीमध्ये हिंसक वळण लागले. यानंतर येथे हिंसाचार झाला. यात जाळपोळ देखील करण्यात आली. यामुळे पोलीस प्रशासनाने शहरात संचारबंदी लावलेली आहे. मात्र आता येथे परिस्थिती बर्याच प्रमाणात नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
खबरदारी म्हणून अमरावतीमध्ये अद्यापही संचारबंदी कायम असणार आहे. तसेच शहरातील इंटरनेट सेवा शुक्रवार (१९ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान, आज दुपारी १२ ते ४ या वेळात शहरात कर्फ्यूमधून शिथिलता देण्यात येणार आहे. संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी आणि इतर महत्वाच्या कामासाठी ४ तासांची शिथिलता देण्यात आली आहे. परिस्थिती सामान्य झाल्यावर संचारबंदी पूर्णत: हटवली जाईल. मात्र, सध्या संचारबंदी कायम राहणार असून, इंटरनेट सेवाही बंदच राहील. आठवड्याच्या शेवटी शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदीत शिथिलता किती द्यायची, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
तसेच अकोला जिल्हातल्या अकोटमध्ये शुक्रवारपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे. दरम्यान, १२ नोव्हेंबरच्या घटनांमध्ये ११, तर १३ नोव्हेंबरच्या घटनांमध्ये २४ असे एकूण ३५ गुन्हे आतापर्यंत दाखल झाले आहेत. तोडफोड व जाळपोळ प्रकरणी हे ३५ गुन्हे नोंदवण्यात आले असून, एकूण १८८ संशयितांना अटक करण्यात आली आहे.