एरंडोल प्रतिनिधी । आपण स्वत: कोरोनाची लस घेतली असून याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. यामुळे अफवांना बळी न पडता कोरोनाची लस घ्यावी असे आवाहन नगरसेवक डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी केले आहे.
एरंडोल येथील डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी नुकतीच कोव्हीड प्रतीबंधक लस भारत सरकारच्या कोव्हीड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात २० जानेवारीला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे टोचून घेतली.भारत सरकारच्या या मोहिमेत पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील जोखमीचे कार्य करणाऱ्या सुमारे ३ कोटी व्यक्तींना हि लस अग्रक्रमाने दिली जात आहे. तर आगामी काळात दुसऱ्या टप्प्यात अंदाजे २७ कोटी नागरिकांना ज्यात प्रामुख्याने ५० वर्षांवरील नागरिकांचा समावेश असणार आहे.अश्याना हि लस देण्याचे नियोजन भारत सरकारचे आहे.
दुर्देवाने पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे व लसीकरण करून घेण्यासाठी स्वतः हुन पुढे येण्यास आरोग्यसेवक कचरत आहे. यास प्रामुख्याने लसीबद्दल असणाऱ्या शंका, लसीमुळे होणारे प्रतिकूल परिणाम, लसीची सुरक्षितता याबद्दल समाज जीवनामध्ये असलेले गैरसमज व विविध समाज माध्यमामध्ये पसरत असलेल्या अफवा आणि खोट्या बातम्या या कारणीभूत आहेत. यासंबंधी डॉ.नरेंद्र ठाकूर यांनी स्वतः हि लस घेतल्यानंतर काहीही त्रास झाला नसल्याचे स्पष्ट करून त्यानंतर दैनंदिन काम हि सुरळीतपणे करत असल्याचे सांगितले. कोठल्याही लसीचे सामान्यपणे जे त्रास होतात जसेकी हात घुखणे, थोडा ताप येणे, थंडी वाजणे, अंगदुखी, घाबरल्यासारखे होणे असा त्रास पहिल्या दोन दिवसात काही नागरिकांमध्ये आढळून येत असून त्यात घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
भारत सरकारने ज्या दोन लसिंना आपकालीन वापरासाठी परवानगी दिलेली आहे त्या दोन्ही लसी या विविध पातळ्यांवर प्रमाणित करून संपूर्णतः सुरक्षित स्थितीत पहिल्या टप्प्यासाठी योग्य त्या यंत्रणेमार्फत सुकर परिस्थितीत आरोग्यकर्मचारी वर्गापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न शासनामार्फत केला जात आहे.
पहिल्या टप्प्यात आतापर्यंत लाखो आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली गेली असून फक्त ५०० ते ६०० व्यक्तींना सौम्य स्वरूपाचा स्वाभाविकपणे होणारा त्रास जाणविल्याचे निदर्शनास आले आहे. टक्केवारीचा अभ्यास केला तर तो फक्त ०:१५ इतका कमी आहे.त्यामुळे भारत सरकारच्या या प्रभावी व गौरवशाली अश्या ऐतिहासिक कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सकारात्मक प्रतिसाद देणे हे सर्वसामान्य नागरिकांचे कर्तव्यआहेच हे लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर स्वतः ला कोरोनापासून बचाव करण्यासाठी, स्वतः ला संरक्षित करण्यासाठी जेव्हा आपणास लस उपलब्ध होईल त्या वेळेस कुठलीही चिंता न करता भीती न बाळगता लसीकरण करून घेतले पाहिजे असे आवाहन डॉ नरेंद्र ठाकूर यांनी केले आहे.