जळगांव : प्रतिनिधी । लाॅकडाऊन जाहीर झालाच तर त्या त्या भागात गरजूंसाठी शासनाने किमान दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणारे निवेदन आज वर्ल्ड दलित आॅर्गनायजेशन ( महाराष्ट्र प्रदेश ) संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले.
आरोग्य प्रशासनाच्या रोजच्या आकडेवारीनुसार काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे काही जिल्ह्यात मोठी आकडेवारी समोर येत आहे.अधिक आकडेवारी येणाऱ्या जिल्ह्यात अथवा भागात शासनाच्या वतीने खबरदारी म्हणून लाॅकडाऊन करण्याबाबत सुतोवाच केले जातेय.
अकरा महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्रमिक व मध्यमवर्गीय सुद्धा आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या असुन त्यात रोज वाढणारी महागाई भर घालतेय. अशा परिस्थितीत लाॅकडाऊन जाहीर करण्याआधी शासनाला सामाजिक संस्था अथवा दानशुर व्यक्तिंच्या भरवशावर आता राहुन चालणार नाही, आर्थिकदृष्ट्या विचार करता आता पुन्हा सर्वच संस्था नागरीकांना मदत करण्यासाठी पुढे येतील याची शक्यता कमीच आहे असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे
लाॅकडाऊन जाहीर करण्यात येणाऱ्या ठिकाणी आधी शासनाच्या वतीने किमान एक किलोमीटरच्या अंतरावर एक या प्रमाणे अन्नछत्र उभारण्याचे नियोजन करावे.शासनाने आधीच स्वयंसेवकांची टीम तयार करुन अन्नछत्रावर अन्नाची पाकीट तयार करुन वाटपासाठी जागोजागी त्यांची नियुक्ती करावी.
अन्नछत्रांच्या ठिकाणांची माहिती पोहचवण्यासाठी संपर्क क्रमांक व यंत्रणा कार्यान्वित करावी अशा मागण्या या संघटनेने केल्या आहेत
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन अहिरे, सरचिटणीस सिद्धार्थ पवार, विकास नारखेडे, जळगांव जिल्हाध्यक्ष कुणाल मोरे , प्रसिध्दी प्रमुख विवेक शिवरामे आदी उपस्थित होते.