जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरातील उमेश पार्क येथील रहिवासी महिलेची ३५ हजार रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरातील उमेश पार्क येथे श्रीमती कविता संजय सोनवणे वय ५३ ह्या वास्तव्यास आहेत. त्या नोकरीला आहेत. २९ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास कविता सोनवणे ह्या घरी असतांना, त्यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला . त्याने वेगवेगळे आमिष देत कविता सोनवणे यांचा विश्वास संपादन केला, तसेच सोनवणे यांच्या दोन्ही वेगवेगळ्या बँकेच्या खात्यातून एकूण ३५ हजार रुपये परस्पर काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कविता सोनवणे यांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड हे करीत आहेत.