अनुसूचित जाती – जमातींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करा

 

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था ।अनुसूचित जाती व जमातींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी अशी सूचना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

या समुदायाच्या विकासासाठी चार सूत्री कार्यक्रमाची आखणी करण्यात यावी असेही सोनिया गांधी यांनी सांगितले आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी ही माहिती दिली.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. काँग्रेस पक्ष हा दलित, वंचित आणि मागासवर्गाच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे, असे पाटील म्हणाले. महाराष्ट्रात आघाडी सरकारमध्ये सहभागी असल्यामुळे आम्ही या वर्गांप्रति असलेल्या आमच्या जबाबदारीबाबत अतिशय सतर्क आहोत. या समुदायातील शिक्षित लोकांचे एक संमेलन देखील आयोजित करण्यात आले होते, असे पाटील पुढे म्हणाले.

पाटील यांच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ज्या चार सू्त्री कार्यक्रमाविषयी सांगितले आहेत, त्या कार्यक्रमानुसार या समुदााच्या लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याबाबतची सूचना प्रमुख आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांची मालकी असलेल्या उपक्रमांसाठी सरकारी ठेके आणि योजनांमध्ये आरक्षणाची व्यवस्था सुरू करण्यात यावी, विविध विभागांमध्ये या समुदायांसाठी आरक्षित असलेली रिक्त पदे भरली जावीत, अशा सूचनाही सोनिया गांधी यांनी केल्या आहेत.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या युवकांसाठी शिक्षण, तांत्रिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच शिष्यवृत्ती सुविधांचा विस्तार केला जावा, अशीही सूचना सोनिया गांधींनी केली आहे. मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदावरील नियुक्तीसाठी निवड प्रक्रिया सुरू झाली असून पुढील काही दिवसांमध्ये त्यावर निर्णय होईल, अशी माहितीही पाटील यांनी दिली आहे.

 

Protected Content