मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. आज विशेष पीएमएलए कोर्टाने पुन्हा माजी गृहमंत्री देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे.
माजी मंत्री अनिल देशमुख यांना शनिवार १६ एप्रिल रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. २९ एप्रिल पर्यंत देशमुख यांच्यासह अन्य तीन जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यांनतर आज सीबीआय च्या विशेष पीएमएलए न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भ्रष्ट्राचार प्रकरणात विशेष सीबीआय चौकशी सुरु असून त्यांची सीबीआय कोठडीची मुदत १६ एप्रिल रोजी संपणार होती, त्यात तीन दिवसानी वाढ करावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत वाढ करीत २९ एप्रिलपर्यंत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य तीन जणांना न्यायालयीन कोठडी दिली होती. त्यानुसार आज २९ एप्रिल रोजी सीबीआयच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने माजी गृहमंत्री देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ केली आहे.