अतिवृष्टी बाधित ३२ गावे सानुग्रहापासून वंचित – मारवड गोवर्धनच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री यांची घेतली भेट

अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील सुमारे ५२ गावांमध्ये २०१९ च्या सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यात निधी प्राप्त झाल्यानंतर २० गावांना वाटप देखील केला गेला. परंतु उर्वरीत ३२ गावांना अद्यापही निधी प्राप्त झालेला नसून या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची मारवडचे सरपंच उमेश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेवून निवेदन सादर केले आहे.

 

सन २०१९(जुलै व सप्टेंबर) मध्ये झालेल्या अतिवृष्टित अमळगावसह तालुक्यातील ५२ गावातील शेती पिकांना जबर फटका बसला होता. याबाबत सातत्याने पाठपुरावा व अनेक अडचणींचा सामना करत हेक्टरी २० हजार ४०० रूपये सानुग्रह मंजूर करण्यात यश मिळाले.त्यांनतर जुलैमध्ये बाधीत २० गावांना सानुग्रह प्राप्त झाला खरा,मात्र अजूनही उर्वरित ३२ गावे (सप्टेंबरमध्ये बाधीत)वंचित आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या भेटीमुळे सकारात्मक चर्चा होवून मारवड शिष्टमंडळ व शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. शिष्टमंडळात दिलीप पाटील गोवर्धन, मधु अण्णा ,ज्ञानेश्वर पवार उमेश सुर्वे तसेच शिवसेना तालुका प्रमुख विजू मास्तर उर्फ विजय पाटील यांचा समवेश होता. यावेळी तहसीलदार यांच्याकडून २० गावांचा सानुग्रह वाटपचा अहवाल जळगावी मागवला असल्याचे सरपंच उमेश साळुंखे यांनी सांगितले आहे.

Protected Content