भुसावळ प्रतिनिधी । अतिवृष्टीमुळे भुसावळ तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यां उभी पिके भुईसपाट झाली असून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पदरी याही वर्षी निराशाच पडली आहे. या नुकसानीचे महसूल यंत्रणेमार्फत सरसकट पंचनामे करून तात्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यात सात दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे किन्ही, खडका तळवेल, पिंपळगाव खुर्द, पिंपळगाव बु, वेल्हाळा, सुसरी,दर्यापुर, सुनसगांव, वांजोळा आदी भागांत शेतामध्ये पाणी साचून उडीद,मूग,तुर,कपाशी, मका, कांदा, भुईमूग आदी उभ्या पिकांची नासाडी झाली आहे
जोरदार पावसामुळे किन्ही, खडका, सुनसगांव, वांजोळा, तळवेल, जोगलखेडा या ठिकाणी प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे, मूग, उडीद, भुइमूग, तूर, या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे
मूग व उडीद या पिकांच्या तोडणीस आलेल्या शेंगाना झाडावरच कोम फुटले असून ते पूर्णपणे खराब झाले आहे,त्यामुळे हातातोंडाशी आलेली खरीप पिके हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने आधीच हतबल झालेला शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे.
सलग तीन चार वर्षांपासून पडलेला दुष्काळ, यातच करोना महामारीचे संकट यामध्ये शेतकरी आधीच भरडला असताना याही वर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सुरुवाती पासूनच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी महागडी बी-बियाणे, खते आदींचा मोठा खर्च करून खरिपाची लागवड केली.
काही ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यातून जी पिके वाचली त्यांना युरिया आदी खते साठेबाजीमुळे वेळेवर उपलब्ध झाली नाही. अशातच सलग सहा-सात दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे या सर्व संकटातून वाचलेली उरली सुरली पिकेही डोळ्यादेखत सडू लागली आहेत.
नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.