अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा – शशिकांत हिंगोणेकर

 जळगाव, प्रतिनिधी ।   केंद्र शासनाने या वर्षाचा भारतरत्न पुरस्कार साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनाच द्यावा ,  असे आग्रही प्रतिपादन साहित्य परिषद जळगाव शाखेचे कार्यकारी सदस्य तथा कवी शशिकांत हिंगोणेकर यांनी केले.

 

जळगाव येथील भारतरत्न डॉ. ए .पी .जे अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व मिसाईल मॅन भारतरत्न डॉ .ए. पी. जे .अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित ऑनलाईन व्याख्यानात अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना कविवर्य हिंगोणेकर  बोलत होते. बोदवड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. वंदना बडगुजर यांचे ” साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील वेगळेपण ”  या विषयानुषंगे नैमित्तिक व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रमुख अतिथी सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल उपस्थित होते. प्रमुख व्याख्यात्या डॉ. वंदना बडगुजर म्हणाल्या की , दलित आणि शोषितांना साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी आत्मभान देऊन जीवन संघर्ष शिकवला. अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र वाड़मयाचा लेखाजोखा घेऊन प्रत्येक साहित्य प्रकारातील  लेखन वैशिष्ट्यांमधील आगळेपण बडगुजर यांनी सोदाहरण सांगितले. प्रमुख अतिथी डॉ. मिलिंद बागुल म्हणाले की,  प्रस्थापीत व्यवस्थेने अण्णाभाऊंना नाकारले. अण्णाभाऊंनी आंबेडकरांच्या तत्वनिष्ठेचा साहित्य लेखनात आजीव पुरस्कार केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच शोषितांना आत्मोद्धार करता आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुरोगामी प्रतिभावंत साहित्यिक सतीश काळसेकर यांचा साहित्य लेखन प्रवास जळगाव जिल्हा पुस्तक भिशी प्रमुख विजय लुल्हे यांनी सांगून श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला आणि उपस्थितांनी मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली दिली. कार्यक्रमाचे संयोजन भारतरत्न डॉ. ए .पी .जे .अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव संलग्न शाखा पाचोरा व एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.  मान्यवरांचा परिचय संदीप गायकवाड, डॉ. विजय बागुल, विजय लुल्हे ,  आशा सोळुंके यांनी करून दिला.  ईशस्तवन व स्वागत गीत  वैष्णवी रविंद्र कुलकर्णी एरंडोल यांनी सुरेल आवाजात सादर केले. अण्णाभाऊ साठे यांचे सुप्रसिद्ध गीत ‘ जग बदल घालुनी घाव,सांगून गेले मला भीमराव ‘ हे भावपुर्ण  गीत गायक राकेश सपकाळे यांनी सादर केले.  युवराज सुरडकर यांनी  ‘माझी मैना गावाला राहिली ,माझ्या जीवाची होतीया काहिली’  हे अण्णा भाऊंचे गीत खड्या आवाजात जोशपूर्ण सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती महाजन देशमुख यांनी तर आभार सुनील दाभाडे यांनी मानले.  कार्यक्रमास ज्येष्ठ  साहित्यिका उषा हिंगोणेकर , ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिंदे ,  लता बडगुजर , संजय नंदवे , सूर्योदय साहित्य मंडळाचे अध्यक्ष सतीष जैन,  प्रकाश बडगुजर, कवी संजय पोलसाने, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, कवी रमेश राठोड मान्यवरांसह साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निवृत्त माध्यमिक उप शिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर , अभियंता संजय भावसार , मिलिंद काळे , प्रमोद माळी, अथर्व प्रकाशनाचे संचालक प्रकाशक युवराज माळी, कुमूद प्रभाशनाच्या संचालिका संगीता माळी, पाचोरा भिशी शाखा समन्वयिका अरुणा उदावंत, सारिका पाटील, एरंडोल भिशी समन्वयिका क्षमा साळी व अंजुषा विसपुते तसेच स्वाती काबरा ,मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

 

Protected Content