राळेगणसिध्दी । माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन केंद्रीय कृषी कायदे हे शेतकर्यांच्या कशा हिताचे आहे हे समजावून सांगितले.
ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनातही सहभागी व्हावे, अशी मागणी होत होती. त्यासाठी दिल्लीतील शेतकर्यांचे शिष्टमंडळही राळेगणसिद्धीला येऊन गेले होते. सुरुवातीला हजारे यांनी या आंदोलनास पाठिंबा देत एका दिवसाचे उपोषणही केले होते. त्याच दरम्यान आपल्या जुन्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणाही हजारे यांनी केली. दिल्लीत आंदोलन करण्यासाठी रामलीला मैदान अथवा जंतर-मंतर येथे परवानगी मिळावी, यासाठी त्यांनी अर्जही केला आहे. अण्णांनी आंदोलनात भाग घेतला तर याचा व्यापक परिणाम होऊ शकतो. यामुळे त्यांनी उपोषण करू नये असे प्रयत्न भाजप नेते करत आहेत.
या अनुषंगाने आज माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन केंद्र शासनाने केलेल्या नवीन कृषी कायद्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली व कायद्याबाबत त्यांचे मत जाणून घेतले. तसेच ह्या कायद्यातील तरतुदी शेतकरी बांधवांसाठी कश्या लाभदायक आहेत ह्याबदद्ल माहिती दिली. या भेटीतील अन्य तपशील मात्र बाहेर आला नाही.