जळगाव प्रतिनिधी । आजीचे अंत्यसंस्कार आटोपून पुन्हा घरी भडगाव येथे जाण्यासाठी निघालेल्या तरूणाच्या दुचाकीला समोर भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहून वाहनाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाल्याची घटना आज शनिवार १७ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तालुक्यातील शिरसोली येथे घडली. धडक दिलेले वाहना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष रमेश पाटील (वय-३४) रा. गोंडगाव ता. भडगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह राहतो. शेती व वाहन चालकाचे काम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. जळगाव शहरातील पंढरपूर नगरात त्यांचे आजी व मामा राहतात. शुक्रवार १६ जुलै रोजी संतोष पाटील यांचे आजी मंजूळाबाई मन्साराम पाटील यांचे वृध्दापकाळाने निधन झाले होते. त्यांच्यावर आज अंतिमसंस्कार करण्यासाठी संतोष पाटील, वडील रमेश वामन पाटील, आई सरस्वताबाई व मोठा भाऊ दिपक असे सर्वजण खासगी वाहन करून जळगावला आले होते. यात संतोष पाटील हा मात्र (एमएच १९ बीए ५४२३) क्रमांकाच्या दुचाकीने जळगावात आला होता. दुपारी १२ वाजता आजीच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर संतोषचे आईवडील व नातेवाईक खासगी वाहनाने भडगावकडे जाण्यासाठी शिरसोलीरोडने पुढे निघाले. तर संतोष पाटील हा दुचाकीने त्यांच्या पाठोपाठ निघाला. दुपारी २ वाजेच्या सुमारास संतोष पाटील हा दुचाकीने जात असतांना शिरसोली गावाच्या पुढे गॅस गोडावून जवळ समोरून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू रिक्षा (एमएच ०४ ईवाय ४१७२) ने धडक दिली. या अपघातात संतोष पाटील याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला.
घटनेची माहिती मिळाले तेव्हा नातेवाईक वावडदापर्यंत पोहचले होते. मोबाईलने संपर्क साधून घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. शिरसोली गावाचे पोलीस पाटील कृष्णा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून मालवाहून वाहन ताब्यात घेवून एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. तर खासगी वाहनाने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. मयत संतोष पाटील यांच्या पश्चात आई सरस्वताबाई, वडील रमेश पाटील, पत्नी रत्नाबाई, युवराज व प्रशांत ही लहान मुले, मोठा भाऊ दिपक व लहान भाऊ गोरख असा परीवार आहे. शेवटचे वृत्तहाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात मालवाहू रिक्षा चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.