पाचोरा, प्रतिनिधी | येथील पिपल्स बॅंकेचे माजी चेअरमन अशोक संघवी यांनी नातेवाईकांना विना रक्कम भरलेला धनादेश घेवुन अमाप कर्ज दिले. व प्रशासक असताना त्यांनी साडे तीन लाखांचे विविध कामांची दुरुस्ती दर्शवुन पैसे लाटले आहे. याप्रकरणी त्यांना १४ दिवसांसाठी पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पाचोरा पिपल्स बॅंकेचे माजी चेअरमन अशोक हरकचंद संघवी हे चेअरमन पदावर असतांना त्यांनी नातेवाईक व जवळील कर्जदारांना अमाप कर्ज वाटप केले होते. याशिवाय बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर बॅंकेवर प्रशासक असतांना संघवी यांचा बॅंकेशी काहीही संबंध नसताना तात्कालीन व्यवस्थापक नितीन टिल्लु यांना हाताशी धरून बॅंकेत काही कामांची देखभाल दुरुस्ती सह फर्निचर बनविण्याचे ३ लाख ५४ हजार रुपयांचे खोटे व्हाऊचर टाकुन पैसे हडप केले. याप्रकरणी येथील संदिप महाजन यांनी १८ जुलै २०१९ रोजी दावा दाखल केला होता. दरम्यान अशोक संघवी यांनी औरंगाबाद खंडपीठात व त्यानंतर हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला. दोन्ही न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळल्यानंतरही अशोक संघवी पोलिसांना दाद देत नव्हते. अखेर पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील यांनी त्यांना दम भरल्याने ते २२ रोजी २०२१ रोजी सकाळी १०: ४४ वाजता पाचोरा पोलिस स्टेशनला हजर झाल्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फिर्यादी संदिप महाजन यांनी अशोक संघवी यांचेसह ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर एका संशयित आरोपीस यापुर्वीच अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. ऑडिटर भाग्यश्री फडणवीस यांनी कामात कुचराई केल्याने त्यांच्यावर ही ठपका ठेवण्यात आला आहे. तात्कालीन व्यवस्थापक नितीन टिल्लु हे अद्याप फरार आहेत. अशोक संघवी यांना अटक झाल्याने व्यापारी बांधवांमध्ये एकच चर्चेचा विषय सुरू आहे.