अक्षय इंडीकर यांना आशिया खंडातला प्रतिष्ठित पुरस्कार

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ओळख असलेला ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कार यंदा मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना जाहिर झाला आहे.

फिल्म जगतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. अक्षय इंडीकर यांची ‘स्थलपुराण’ या चित्रपटातील विशेष दिग्दर्शकीय कामगिरी लक्षात घेता त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. ऑस्ट्रेलियातील ‘आशिया पॅसेफिक स्क्रीन अकॅडमी’, ‘ग्रिफिथ स्कूल’ आणि ‘युनेस्को’ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. आता हा पुरस्कार अक्षय इंडीकर यांना मिळणार आहे.

आशिया पॅसिफिक विभागातील सुमारे ७० देशांमधून या पुरस्कारासाठी एकाची निवड केली जाते. आजतायगत सुमारे ३००० सिनेमे या पुरस्काराच्या स्पर्धेत उतरले आहेत. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी अक्षय इंडीकर यांना मिळालेला हा बहुमान ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

‘उदाहरणार्थ नेमाडे’ या वेगळ्या धाटणीच्या सिनेमापासून आपल्या कारकीर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात करणारे अक्षय इंडीकर, आपल्या स्वतंत्र व अनोख्या शैलीमुळे जगभरात नावाजले गेले आहेत. उदाहरणार्थ नेमाडेनंतर ‘त्रिज्या’ व ‘स्थलपुराण’ हे त्यांचे सिनेमे जगभारतल्या अत्यंत प्रतिष्ठित सिनेमहोत्सवात झळकले. स्थलपुराण हा सिनेमा बर्लीन अंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात ‘जनरेशन कॉम्पिटिशन’ या विभागात प्रदर्शीत झाला होता. शिवाय अतिशय मानाच्या अशा क्रिस्टल पुरस्कारासाठी त्यांना नामांकनं ही मिळाले होते.

या आधी असघर फरादी, बॉग्न जून हो, मनोज बाजपेयी, राजकुमार राव, नवाजुद्दीन सिद्दकी यांच्यासारख्या सिनेक्षेत्रात काही वेगळं करून दाखवणाऱ्या कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. अनेक कारणांनी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या पुरस्काराची काही प्रमूख वैशिष्ट्ये म्हणजे, या पुरस्कार विजेत्याला पुरस्कारासोबत आशिया पॅसिफिक स्क्रीन अकॅडमीची मिळणारी सन्माननीय सदस्यता. तसेच हा विजेता, सिनेमा निर्मितीसाठी अकॅडमीकडून मिळणाऱ्या निधीसाठी देखील पात्र ठरतो. या पुरस्कारामुळे संपूर्ण जगातल्या केवळ १३०० लोकांना मिळणाऱ्या या सदस्यत्वाचा बहुमान आता अक्षय इंडीकर यांना मिळणार आहे.

Protected Content