नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ज्या लोकांनी अंकितला ठार केले, ते लोक ‘जय श्रीराम’चे नारे देत होते. त्यांच्या हातात तलवारी होत्या, अशी धक्कादायक माहिती इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीचे कर्मचारी मयत अंकित शर्मा यांची बंधू अंकुर शर्मा यांनी दिली आहे.
दिल्लीत झालेल्या धार्मिक हिंसेत इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीच्या अंकित शर्मा या कर्मचाऱ्याच्या निर्घुण हत्येसंदर्भात एक नवीन धक्कादायक खुलासा झालाय. ‘द वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार अंकितचा भाऊ अंकूर शर्मा यांनी आज सांगितले की, ज्या लोकांनी अंकितला ठार केले, ते लोक ‘जय श्रीराम’चे नारे देत होते. त्यांच्या हातात तलवारी होत्या. अंकित जेव्हा घरी परतत होता त्यावेळी हिंसा करणाऱ्या एका समूहाने दगडफेक सुरू केली आणि त्याला एका गल्लीत नेले. हिंसा करणाऱ्यांकडे दगड, काठ्या, चाकू आणि तलवारी होत्या. ते जोरजोरात जय श्रीराम, जय श्रीरामचे नारे लावत होते. यापैकी काहींनी हेल्मेट परिधान केलेले होते. यावेळी जे लोक अंकितची मदत करण्यासाठी समोर आले त्यांच्यावर देखील या लोकांनी हल्ला केल्याचे अंकूर शर्मांनी सांगितले. दरम्यान, अंकितच्या कुटुंबीयांनी अंकितच्या हत्येचा आरोप आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहीर हुसेन यांच्यावर लावला आहे. हुसेन यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. दिल्लीच्या हिंसाचारात आतापर्यंत ४२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, अंकितची अत्यंत निर्घुणपद्धतीने हत्या करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह गटारीत सापडला होता.