व्यापारी संकुलातील अतिक्रमण धारकांच्या प्राधान्यासाठी प्रशासनाची साकारात्मक भूमीका

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नगरपरिषदेच्या फायनल प्लॉट क्रमांक 123 या साईडमध्ये पालिकेच्या वतीने निर्माण होणाऱ्या व्यापारी संकुलात अतिक्रमण धारकांनाच प्राधान्य हवे हा आपला आग्रह कायम असून त्यादृष्टीने कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू आहे आणि यासाठी स्थानिक व जिल्हा प्रशासन देखील सकारात्मक असल्याने कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास आमदार अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 

यासंदर्भात पत्रकारांना अधिक माहिती देताना आमदारांनी सांगितले की पालिकेच्या फायनल प्लॉट 123 मध्ये अतिशय मोठे व्यापारी संकुल निर्माण होत असल्याने येथे व्यावसायिकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होऊन गावातील अतिक्रमण हटणार असल्यांने रस्त्यातील अडथळे देखील दूर होणार आहे.यामुळे शहराच्या सौंदर्यात देखील भर पडून मार्केट व्हॅल्यू मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.खरेतर या जागेत अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत असलेल्या अतिक्रमण धारकांनी सहकार्य केल्यामुळेच प्रत्यक्ष हे काम सुरू होऊ शकले आहे,यामुळे संकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमण धारकांनाच वाऱ्यावर सोडणे अतिशय चुकीचे होणार आहे.ज्या दिवशी अतिक्रमण धारकांनी आपले अतिक्रमण काढले त्याच दिवशी संपूर्ण कायदेशीर बाबी तपासल्यानंतर या संकुलात त्याना नक्की प्राधान्य मिळेल हा शब्द आम्ही नगरपालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी आणि अधिकारी वर्गासमोर दिला आहे.त्यानंतर जिल्हाधिकारी  यांच्याशी देखील सकारात्मक चर्चा झालीच आहे.टाऊन प्लॅनिंग च्या अधिकाऱ्यांशी देखील बोलणे झाले असून तेथेही काही अडचण येईल असे वाटत नाही.

 

खरे पाहता याठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळे उपलब्ध होणार असल्याने कुणीही अतिक्रमण धारक वंचित राहणार नाही यात कोणतीही शंका नाही.राहिला प्रश्न ऑनलाइन लिलाव पद्धतीचा तर त्यात देखील मार्ग काढून अतिक्रमण धारकाना न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे. सदर व्यापारी संकुल मार्केट च्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने काही मंडळी या संकुलावर नजर ठेवून आहे.त्यांनी दुकाने घेण्यास आमची कोणतीही हरकत नाही पण माझा गोरगरीब व्यावसायिक त्याच्या हक्कापासून वंचित राहायला नको या मताशी मी ठाम आहे.आणि ज्या सामान्य व्यावसायिकांना आतापर्यंत अतिक्रमणधारक म्हणून लेबल लागले ते लेबल निघून त्यांना ताट मानेने व्यवसाय करता यावा हीच आपली प्रामाणिक इच्छा आहे.

 

असे असताना काही मंडळी ऑनलाइन पद्धतीनेच लिलाव होणार असल्याने अतिक्रमण धारकांचा येथे मुळीच संबंध राहणार नाही अश्या वलग्ना करून या सामान्य व्यवसायिकांना जगणे अवघड करीत आहे. पण व्यावसायिकांनी देखील या निरर्थक चर्चेला न घाबरता सध्या फक्त वेट अँड वॉच ची भूमिका ठेवावी आमदार अनिल पाटील आपल्या सोबत असल्याने कुणाचेही नुकसान होऊ देणार नाही मी स्वतः तसेच नगरपालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांचे माध्यमातून सुकर मार्ग नक्कीच निघेल असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला आहे.

Protected Content