जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शाहू नगरात राहणाऱ्या बांधकाम करणाऱ्या तरूणाचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना कालिंका माता मंदीर परिसरात बुधवारी २१ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. शेख समीर शेख राज मोहम्मद (वय-२२) रा. इंदिरा नगर, शाहू नगर, जळगाव असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख समीर हा आपल्या आई व लहान भावासोबत शाहू नगरातील इंदिरात नगरात वास्तव्याला होता. बांधकामाच्या ठिकाणी मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. सध्याचे त्याचे खेडी शिवारातील कालिंका माता मंदीर परिसरात बांधकामाचे काम सुरू होते. बुधवारी २१ मे रोजी दुपारी १ वाजता बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या बोरींगच्या वायर स्पर्ध झाल्याने शेख समीर याला जोरदार वीजेचा धक्का बसला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरीक व बांधकाम करणारे कामगारांनी धाव घेत वीजपुरवठा बंद करून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत पोलीसात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.