विरारच्या मृतांच्या वारसांना पंतप्रधान मदत निधीतून २ लाखांची मदत

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आपत्कालीन मदतनिधीमधून विरारच्या  विजय वल्लभ रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या  वारसांना  प्रत्येक दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

 

बुधवारी नाशिकमधील रुग्णालयामध्ये ऑक्सिजन गळती होऊन  २४  जणांचा मृत्यू झाल्याचं  ताजं असतानाच आज विरारमधील विजय वल्लभ  कोव्हिड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. मध्यरात्री आयसीयूमध्ये आग लागली

 

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून विरार येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत देण्यास मंजूरी दिलीय. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजारांची मदत देण्याचाही निर्णय घेण्यात आलाय,” असं ट्विट पीएमओच्या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींनी घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे.

 

“विरारमधील विजय वल्लभ रुग्णालय दुर्घटनेबद्दल  मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले,” अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत दिली आहे. . या खासगी रुग्णालयात अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत,”

 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी  चौकशीचे आदेश दिले आहेत. “विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळल्याने मृत्यू ओढवला.  घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत,” अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.

 

“विरारमधील घटना दुर्दैवी आणि ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. ज्यांचा काही दोष नाही त्यांना जीव गमवावा लागला आहे. मी जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, स्थानिक आमदार आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर एसीचा स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं. एसीचा स्फोट झाल्यानंतर  तीन मिनिटांत धूर झाला आणि आगीने घेरलं. दरवाजाच्या अगदी जवळ होते ते चार रुग्ण वाचू शकले. पण आयसीयूमध्ये असणारे इतर १३ रुग्ण वाचू शकले नाहीत,” असं राजेश टोपेंनी  सांगितलं. “हे खासगी रुग्णालय असून माणिक मेहताच्या मालकीची इमारत आहे. दिलीप शाह आणि पाठक गेल्या पाच वर्षांपासून हे रुग्णालय चालवत आहेत. तीन मजल्यांची इमारत असून दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली.  अशी माहिती राजेश टोपेंनी दिली. “ही घटना दुर्दैवी असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणलं आहे. शासकीय स्तरावरुन योग्य मदत केली जाईल.  हा स्फोट कसा झाला? तो टाळता येऊ शकला असता का? याची चौकशी होणं गरजेचं आहे,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

Protected Content