विद्यापीठात योग मार्गदर्शन केंद्रातर्फे ‘जागतिक योग दिन’ साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योग मार्गदर्शन केंद्राच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने बुधवार दि. २१ जून रोजी योग प्रात्यक्षिक घेण्यात आले. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्यासह २०० विद्यार्थ्यांनी योग प्रात्याक्षिकात सहभाग घेतला.

 

विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये देखील योग प्रात्यक्षिक घेण्यात आले. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल, संचालक डॉ. राजेश जवळेकर, वित्त व लेखा अधिकारी सीए. रवींद्र पाटील, क्रिडा संचालक डॉ. दिनेश पाटील, एनसीसी १८ बटालियनचे प्रमुख सुभेदार मेजर प्रेमसिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी बोलतांना प्रा. माहेश्वरी यांनी आंतरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योग महत्वाचा घटक असल्याचे सांगून योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत योग विभाग सुरू होत असून एम. ए. (योगशास्त्र) सुरू होणार आहे असे त्यांनी सांगितले. केंद्राचे प्रमुख इंजि. राजेश पाटील यांनी प्रास्ताविकात योग केंद्राच्या वाटचालीची माहिती दिली. केंद्राच्या सहायक प्राध्यापिका डॉ. लीना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षिका लिन्ता चौधरी व माधवी तायडे या सहशिक्षिकांसमवेत योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी केंद्राच्यावतीने योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कुलगुरूच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सोमनाथ वडनेरे, दीपक गावित, सुभेदार रामकिसन, सीएचएन राजुराम, यशवंत गरूड, सुनील चव्हाण, हिंमत जाधव, अश्वीन सोनवणे, भगवान सांळूखे, रत्नाकर सोनार आदींचे सहकार्य लाभले.

Protected Content