विद्यापीठाच्या “या” अभ्यासक्रमांचे निकाल गुणांची टक्केवारीने जाहीर केले जाणार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील उन्हाळी परीक्षांचे बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. या तीन वर्षीय अभ्यासक्रमांचे निकाल प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षात मिळालेल्या गुणांची टक्केवारी विचारात घेवून निकाल जाहीर केले जाणार आहेत.

 

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व विद्यापीठांमध्ये पदवी प्रदान करण्याच्या पध्दतीमध्ये एक वाक्यता आणण्याच्या दृष्टीने सर्व विषयांचे एकत्रित गुण मिळवून पदवी प्रदान करावी. केवळ शेवटच्या वर्षातील दोन सत्रांचे गुण किंवा द्वितीय व तृतीय वर्षातील सर्व सत्रांचे गुण मिळून पदवी न देता संपूर्ण कालावधीतील सर्व सत्रांचे गुण विचारात घेतले जावेत असे आदेश दिले होते.

 

याबाबत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने ठराव देखील मंजूर केला होता. त्याची अंमलबजावणी आता शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये उन्हाळी परीक्षांचे बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. या तीन वर्षी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करतांना केली जाणार आहे. त्यामुळे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष अशा तीन वर्षात (सहा सत्रात) मिळालेल्या गुणांची टक्केवारी विचारात घेवून परीक्षांचे निकाल जाहीर होणार आहेत. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी दिली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या झालेल्या बैठकीत या बाबत निर्णय झाला आहे असे ते म्हणाले.

Protected Content