नवी दिल्ली: वृत्तसंस्था । प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या मागे बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. वाड्रा यांनी आता राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु, प्रियांका गांधी त्यांना राजकारणात येऊ देईल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची आयकर विभागाने सलग दोन दिवस चौकशी केली होती. त्याशिवाय मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडूनही त्यांची आधीच चौकशी सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वाड्रा यांनी राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. देशाची सेवा करता करता शहीद झालेल्या कुटुंबातून मी आलोय. मी देशातील अनेक भागात राहिलेलो आहे. त्यामुळे मला वाटतं दुष्प्रवृत्तींविरोधात लढण्यासाठी संसदेत जाणं हे महत्त्वाचं आहे, असं वाड्रा यांनी सांगितलं.
मी प्रदीर्घ काळ बाहेरची लढाई लढली आहे. परंतु, तरीही मला वारंवार त्रास दिला जात आहे. मी राजकारणात नसल्यानेच असं होत आहे, असं सांगतानाच आता राजकारणात प्रवेश करण्याचा मी योग्य वेळीच निर्णय घेईल, असं त्यांनी सांगितलं. लोकांनी मला स्वीकारलं पाहिजे. मला मतदान केलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी मी काही करू शकेन, असा मतदारसंघ मी शोधणार आहे. विशेषत: माझ्या कुटुंबीयांनाही माझ्या राजकारण प्रवेशाचा निर्णय पचनी पडला पाहिजे, असंही ते म्हणाले.
२०१९ मध्ये लोकसभा निवडणूक हरल्यानंतर आणि राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं होतं. त्यानंतर काँग्रेस हेडक्वॉर्टर बाहेर होर्डिंग्ज लागले होते. त्यावर सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह रॉबर्ट वाड्रा यांचेही फोटो होते. लोकसभा निवडणुकीतही उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये वाड्रा यांचे पोस्टर लागले होते. त्यात त्यांना निवडणूक लढण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याआधी २०१६ मध्ये लोकशाही बचाव मार्चच्या पोस्टरमध्येही वाड्रा यांचा राहुल यांच्यासोबत फोटो दिसला होता. त्यामुळे वाड्रा हे लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश घेण्याचे संकेत मिळत होते.
६ फेब्रुवारी २०१२ मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठीत वाड्रा आले होते. त्यावेळी त्यांनी लोकांची इच्छा असेल तर मी राजकारणात यायला तयार आहे, असं म्हटंल होतं. तेव्हा वाड्रा यांचं विधान मीडियाने चुकीच्या पद्धतीने दाखवल्याची सारवासारव प्रियांका गांधी यांनी केली होती. त्यानंतर वाड्रा यांनीही सारवासारव करताना मी उद्योग व्यवसायातच बरा असं सांगत राजकारणात येणार नसल्याचं म्हटलं होतं