मूळजी जेठा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  ‘रुजवू मराठी, फुलवू मराठी, चला बोलूया फक्त मराठी, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टीळा’ अशा घोषणा देत ग्रंथदिंडी आणि शोभायात्रेत शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषेत आलेले मूळजी जेठा महाविद्यालयातील विद्यार्थी शोभायात्रेत सहभागी होऊन मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करीत होते. मूळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिनानिमित्त’ आयोजित ग्रंथदिंडीचा प्रारंभ काव्यरत्नावली चौकातून करण्यात आला.

 

यावेळी लेखिका माया धुप्पड, कवी अशोक पारधे, कवी गोविंद पाटील, चंद्रकांत भंडारी,  संजय हिंगोणेकर हे साहित्यिक मू. जे. महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील सर्व प्राध्यापक ए.टी. झांबरे शाळेतील लेझीम पथक असलेले विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीची सुरवात ग्रंथपूजनाने करण्यात आली.  महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीजवळ ग्रंथदिंडीचा समारोप करण्यात आला.

 

मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांचं दर्शन व्हावे हा उद्देश आहे. आणि म्हणूनच ग्रंथदिंडी, पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांची शोभायात्रा (विद्यार्थी व विद्यार्थिनी) यामध्ये वारकरी संप्रदाय परंपरा दर्शन आणि मराठीतील निवडक साहित्यिक (वेशभूषा व सादरीकरण) झालेले ३५० अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

 

ग्रंथदिंडीनंतर जुना कॉन्फरन्स हॉल येथे मराठी विभाग व अखिल भारतीय साहित्य  परिषद यांच्या वतीने मराठीतील सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका डॉ. उमा कुलकर्णी, पुणे यांचे ‘मराठी भाषा, साहित्य संस्कृती आणि अनुवाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित केलेले होते. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या आज मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान तुमच्या उत्साहातून दिसतो आहे. परंतु त्याचवेळी मराठी भाषेच्या विकासासाठी आपण प्रत्येकाने कृतीशील प्रयत्न केले पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल की नाही? या प्रश्नाऐवजी देवनागरी लिपीचा इतिहास शोधणारे संशोधन होणे जास्त आवश्यक आहे. त्यामुळे मराठी भाषेची प्राचीनता शोधता येईल.

 

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या, मराठीबरोबर इतर देशी भाषा जपल्या पाहिजेत. अनुवादाचे विस्तीर्ण जग तुम्हाला रोजगार मिळवून देऊ शकते. मात्र त्यासाठी मराठीत्तर भाषादेखील शिकल्या पाहिजेत. मातृभाषेचा अभिमान किती महत्त्वाचा आहे याची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. भाषा ही जीवनदायिनी आहे ती वाढविण्यासाठी प्रयत्न करा असेही त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशीकांत वडोदकर होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, कुसुमाग्रजांनी मराठीत अमोल साहित्य निर्माण केले आहे. त्याचे वाचन आणि श्रवण केले पाहिजे. आजच्या पिढीने भाषिक जाणिवा समृद्ध केल्या पाहिजेत असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कुसुमाग्रजांच्या काही कवितांचा भावार्थ उलगडून दाखविला. यावेळी विचारमंचावर अखिल भारतीय साहित्य परिषदेचे शहराध्यक्ष मा. सुधीर ओखदे, संरक्षक डॉ. सुभाष महाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील यांनी केले.

 

मराठी भाषा आणि संस्कृती यांचा आविष्कार असलेला सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, महाराष्ट्र राज्यगीत, मराठी अभिमानगीत सादर केले. त्यानंतर नृत्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर केली. विद्यार्थिनींनी दोन लावण्या सादर केल्या. नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनीने नक्कल सादर केली. राजनंदिनी या विद्यार्थिनीने पावरा बोलीतून मराठी भाषेचे महत्त्व सागितले. अमरसिंग ठाकरे या विद्यार्थ्याने पावरा बोलीतील  गीत सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी आदिवासी लोकनृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंचल धांडे तर आभार प्रा. विजय लोहार यांनी मानले.

Protected Content