मुलाचे १० दिवसांवर लग्न, पित्याचा पत्रिका वाटताना हृदयद्रावक अंत !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवघ्या १० दिवसांवर मुलाचा विवाह…बापाची पत्रिका वाटण्याची घाई… सकाळी ऑफिसच्या जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पत्रिका वाटण्यास निघाले. दुपारी एरंडोल येथील कार्यालयात असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला.. त्यातच त्यांचा मृत्यू … मन हेलावणारी हि घटना मंगळवारी २३ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. ग.स. सोसायटी येथे कार्यरत प्रशासन अधिकारी महेंद्र रामा मोरे यांचा लग्नाच्या पत्रिका वाटताना धक्कादायक मृत्यू झाला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जीवन नगरात ग. स. सोसायटीचे प्रशासन अधिकारी महेंद्र रामा मोरे (वय ५७) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचा मोठा मुलगा विक्रांत याचे १ जून रोजी लग्न होते. यानिमित्त ते मंगळवारी २३ मे रोजी सकाळी पत्रिका वाटण्यासाठी बाहेर पडले. चोपडा, अमळनेर, धरणगावमार्गे ते एरंडोल येथील ग. स. सोसायटीच्या कार्यालयात पत्रिका वाटण्यास ३ वाजेच्या सुमारास आले होते. खुर्चीवर बसले असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना जवळच्याच रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी नेले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जळगाव येथे नेण्यास सांगितले. जळगाव शासकीय रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.

यावेळी महेंद्र मोरे यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच आक्रोश केला. रुग्णालयात ग. स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी शारदा, मोठा मुलगा विक्रांत, लहान मुलगा कुणाल असा परिवार आहे. विक्रांत पुण्यात कंपनीत तर लहान मुलगा एमबीएचे शिक्षण घेत आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Protected Content