भाजपा सरकार युवकांची घोर फसवणूक करत आहे : नाना पटोले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारत हा तरुणांचा देश आहे, ही युवाशक्ती देशाच्या प्रगतीत महत्वाचे अंग आहे. युवाशक्तीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार युवकांची घोर फसवणूक करत आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशातील ज्वलंत प्रश्नासह तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

 

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक टिळक भवनमध्ये संपन्न झाली. या बैठकीला मार्गदर्शन करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, देशात मागील ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आहे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले पण नोकऱ्या दिल्या नाहीत. तरुणांचे नोकरीचे स्वप्न भाजपा व मोदींनी अंधकारमय केले आहे. अग्निवीर सारखी भरती योजना आणून तरुणांच्या तसेच देशाच्या सुरक्षेशी खेळ मांडला आहे. तरुणांना रोजगार देण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. भाजपा व नरेंद्र मोदी यांनी तरुणांची घोर फसवणूक केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही नोकर भरती करण्याच्या घोषणा केल्या पण त्या पूर्ण केल्या नाहीत. नोकर भरतीच्या नावाखाली तरुणांची लुट केली जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षांमध्ये सावळा गोंधळ सुरु आहे. यासह सर्व महत्वाचे प्रश्न हाती घेऊन तरुणांनी सरकारला जाब विचारला पाहिजे.

 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाने काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे पण यापेक्षा मोठा विजय मिळवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर संघर्ष करण्याची तयारी ठेवा, मिळालेल्या संधीचे सोने करणे तुमच्याच हातात आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून जगात एक मोठा संदेश दिला आहे, हाच संदेश घराघरात पोहचवा. राज्यात व देशात काँग्रेसची सत्ता आणण्याचा निर्धार करून काम करा, राहुल गांधी यांना पंतप्रधान होण्यापासून कोणतीच शक्ती रोखू शकत नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

युवक काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवासन, प्रभारी कृष्णा अलवुरू, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाला राऊत, जितेंद्रसिंह यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content