पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात मतदार याद्या व भूसंपादन विषयावर जिल्हास्तरीय आढावा बैठक नाशिक विभागाचे उपायुक्त अरुण आनंदकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून आदिवासी भिल्ल समाज बांधवांना रेशन कार्ड व जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
सन – २०२२ या संपूर्ण वर्षात विविध निवडणुका येणार असून मतदारयादीत बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. संपूर्ण निवडणुका याच मतदान यादी द्वारे घेतल्या जाणार असल्याने या याद्या अद्यावत बनविण्यासाठी १८ वर्षावरील नवीन मतदारांचा यादीत समावेश करणे, मयत उमेद्वारांची नावे वगळणे, अनेक ठिकाणी मतदारांची नावे यादीत असल्यास कमी करून एकाच ठिकाणी ठेवणे अशा स्वरूपाच्या अद्यावत याद्या तयार व्हाव्यात, कारण परिपूर्ण व दोष विरहित मतदार यादी ही निकोप लोकशाहीचा पाया असल्याचे नाशिक विभागाचे उपायुक्त अरुण आनंदकर यांनी सांगितले. पाचोरा येथील विभागीय कार्यालयात मतदारयादी संशोधन व भूसंपादन या विषयावर जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलहुले, पाचोरा विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, जळगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी महेश सुतळकर, जिल्हा भूसंपादन अधिकारी किरण सावंत पाटील, राजेंद्र वाघ, तहसिलदार कैलास चावडे (पाचोरा), अमोल मोरे (चाळीसगाव), मुकेश हिवाळे (भडगाव), नामदेव टिळेकर (जळगाव), आढाव बैठकीस उपस्थित होते.
संपूर्ण भारतासह राज्यात सन – २०२२ मध्ये विविध निवडणुका होणार असल्याने या निवडणुका निकोप पार पडाव्यात व त्यासाठी अद्यावत मतदारयाद्यांचे काम अंतिम टप्य्यात सुरू असल्याने व भूसंपादन विभागाचे विविध ठिकाणी काम रखडलेले असल्याने ते त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर सुव्यवस्थित करून घेण्यासाठी पाचोरा येथे जिल्हा भरातील तहसिलदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपायुक्त अरुण आनंदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलहुले, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार भागवत पाटील, नायब तहसिलदार मोहन सोनार (महसूल), पुरवठा विभागाच्या नायब तहसिलदार पूनम थोरात, पुरवठा अव्वल कारकून उमेश शिर्के, अभिजित येवले, सुरेश पाटील, रणजित पाटील, मनोज महाजन, योगेश कोष्टी, हेमंत जडे, शिवप्रसाद पाटील, साहेबराव पाटील, तलाठी आर. डी. पाटील, मयूर आगरकर उपस्थित होते.
आदिवासी भिल्ल समाज बांधवांना रेशन कार्ड व जातीच्या दाखल्यांचे वाटप
पाचोरा तालुक्यातील अनेक गावांत आदिवासी भिल्ल समाजाच्या नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून रेशन कार्ड व जातीचे दाखले उपलब्ध झालेले नसल्याने, आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ अहिरे, तालुकाध्यक्ष धर्मा भिल, सचिव साईनाथ मोरे, सदस्य दत्तू अहिरे, दादा सोनवणे, बापू मोरे, या युवकांच्या माध्यमाने उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल व तहसिलदार कैलास चावडे, यांनी तातडीने दखल घेत उपायुक्त आनंदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलहुले यांच्या हस्ते १९ लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून प्रत्येकी २० हजाराचे धनादेश वीस नागरिकांना जातीचे दाखले, १५ नागरिकांना रेशन कार्डाचे वाटप करण्यात आले. यावेळी आयुक्त राधाकृष्ण पाटील यांनी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी सुरू केलेल्या उभारी योजनेचे काम पाचोरा विभागाने सर्वोत्कृष्ट केल्याने उपायुक्त अरुण आंनदकर यांनी तात्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे यांचे आढाव बैठकीत कौतुक केले.