पथदिवे, रेल्वे बोगद्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करा!

 

जळगाव,प्रतिनिधी । आशाबाबा नगर आणि सेंट्रल बँक कॉलनीला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून रेल्वे बोगदा कामी येऊ शकतो अशी माहिती नगरसेवकांनी दिली असता रेल्वे बोगदा करण्यासाठी आणि जुना बोगदा दुरुस्तीकामी तात्काळ रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करावा अशा सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी दिल्या.

‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १० मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक सुरेश सपकाळे, चेतन सनकत, माजी स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, मनोज आहुजा, भारत कोळी, मनोज काळे, शफी शेख, बंटी बारी, अतुल बारी, मनोज काळे, कुंदन काळे आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

पाईपलाईनचे काम पूर्ण करून जोडण्या त्वरित द्या

पिंप्राळा परिसरात असलेल्या सिद्धीविनायक कॉलनीत नाल्यामुळे अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्याचे काम अपूर्ण राहिले असल्याची समस्या नागरिकांनी मांडली. उपमहापौर सुनील खडके यांनी अधिकाऱ्यांनी सूचना देत मक्तेदाराच्या प्रतिनिधीशी बोलण्यास सांगितले. पुढील पंधरा दिवसात काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गणपती नगरात देखील काही ठिकाणी अमृत योजनेचे काम बाकी असल्याने ते पूर्ण करावे, असे उपमहापौरांनी सांगितले.

पथदिवे सुरू करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी केली चर्चा

आनंद मित्र सह गृह निर्माण संस्था परिसरात रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब आल्याने रस्ता अरुंद झाला आहे. खांबामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने ते रस्त्याच्या एका कडेला स्थलांतरित करून रस्ता मोकळा करावा, अशा सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी दिल्या. खंडेराव नगर, आझाद नगर परिसरात जवळपास २ हजार घरे असून एकही पथदिवा सुरू नाही. अनेक वेळा पाठपुरावा केला तरीही पथदिवे सुरू होत नसल्याची समस्या नागरिकांनी मांडली. उपमहापौर सुनील खडके यांनी तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली. आझादनगर परिसरातील पथदिवे लवकर सुरू होणार असून खंडेराव नगरात केबल टाकावी लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली. योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी अशा सूचना उपमहापौरांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या.

अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे
खंडेराव नगर परिसर आणि मल्हार मंदिर मुख्य रस्त्यावर काही नागरिकांनी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केले असल्याने गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी नागरिकांनी मनपाला अर्ज द्यावा आणि मनपा अधिकाऱ्यांनी ९ मीटर रस्त्याची मोजणी करून अतिक्रमण हटवावे अशा सूचना केल्या.

आझाद नगर आणि हुडकोच्या विकासासाठी कामांची तरतूद करावी
आझाद नगर परिसरातील आणि पिंप्राळा हुडको परिसरातील अनेक विकास कामे अद्यापही प्रलंबित आहेत. नागरिकांना सोय सुविधा मिळत नसल्याचे नगरसेवकांनी मांडले. उपमहापौर सुनील खडके यांनी प्रलंबित कामांचा आढावा घेत काही कामांचा समावेश दलितोत्तर विकास निधी किंवा अल्पसंख्याक विकास निधीत करावा असे सांगितले. पिंप्राळा हुडकोतील बिल्डिंग क्रमांक १ ते २६ येथे गटार तयार करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, असेही उपमहापौरांनी सांगितले.

Protected Content