पत्नीचा खून करणाऱ्या पतीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील खर्दे येथे पत्नीला साप चावल्याचा बनाव करून लाकडी दांडका टाकून जमीनीत तोंड दाबून खून करणाऱ्या पतीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी २० जून रोजी दुपारी २ वाजता दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. सापतनेकर यांनी दिला.

धरणगाव तालुक्यातील खर्दे शिवारातील शेतात विठाबाई नामदेव जाधव (वय-६०) यांना त्यांचे पती नामदेव जाधव यांनी ३० डिसेंबर २०२१ रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मयत विठाबाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदना दरम्यान, त्यांच्या शरिरावर १७ प्रकारच्या जखमा होत्या. तसेच तोंडात माती असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार वैद्यकीय अधिकार्‍यांनी महिलेचा मृत्यू बोथट हत्याराने वार करुन व गुदमरल्याने झाला असल्याचा अभिप्राय दिला होता. त्यानुसार नामदेव जाधव याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करीत असतांना साक्षीदार बाळू चव्हाण याला दिलेल्या कबुली जबाबवारुन आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर प्रत्यक्ष साक्षीदार नसतांना परिस्थितीजन्य पुराव्यांवरुन विठाबाई जाधव यांचा मृत्यू साप चावून नव्हे तर त्यांचा निर्घृण खून झाला असून त्याबाबतचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानुसार मंगळवारी २० जून रोजी दुपारी २ वाजता या खटल्याची सुनावली जिल्हा व सत्र न्यायाधीश व अति. सत्र न्यायाधीश एस. एस. सापतनेकर यांच्या न्यायालयात पार पडली. यामध्ये सरकार पक्षाकडून ९ साक्षीदारांची जबाब नोंदविण्यात आले. त्यानुसार महिलेचा पती नामदेव जाधव याला दोषी ठरवित त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाकडून अतिरीक्त सरकारी अभियोक्ता सुनिलकुमार चोरडीया यांनी तर पैरवी अधिकारी ताराचंद जावळे, केसवॉच म्हणून विलास पाटील यांनी सहकार्य केले.

Protected Content