जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरमालक गावाला गेल्याने घर बंद असल्याचा फायदा घेत, शहरातील दौलत नगर भागात चोरट्यांनी ९० हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुरुवार दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरुध्द रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौलतनगरात संतोष भाऊलाल नेटके हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. नेटके हे जळगाव तालुक्यातील पाथरीचे आहेत, मात्र मुलांच्या शिक्षणासाठी ते जळगावात राहतात. मंगळवारी ते आपली पत्नी सोनी नेटके व मुलगी भूमिका यांच्यासह पाथरी येथे गेले. तर मुलगा व साडूची मुलगी हे नाशिकला गेल्यामुळे दोन दिवसांपासून घर बंद होते. बंद घर असल्याची संधी साधून चोरट्यांनी बुधवारी रात्री घर फोडून घरातून ४७ हजार ५०० रुपयांची रोकड रक्कम, ५ ग्रॅम व ४ ग्रॅम वजनाच्या ४० हजार किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व एक ३ हजार किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबविला आहे. दरम्यान, गुरुवारी २२ जून सकाळी नळ आल्यानंतर नेटके यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे शेजारील रहिवाशी विजय नथ्थु कोल्हे यांनी घरात विचारले असता, घरातून ते गावाला गेले असल्याचे कळले. मात्र, नेटके यांचे घर उघडेच असल्याने त्यांच्या घरात चोरी झाल्याचे कोल्हे यांच्या लक्षात आले. त्यानंतर कोल्हे यांनी नेटके यांना याबाबतची माहिती दिली. नेटके यांनी घरी येवून, याबाबतची माहिती पोलीसांना दिली. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे संजय सपकाळे व सुशिल चौधरी या दोघांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर संतोष नेटके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.