दुचाकी चालवतांनाच हार्ट अटॅक : एकाचा मृत्यू; दोन जखमी

यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपली पत्नी व मुलासह दुचाकीवरून जात असलेल्या इसमाला हार्ट अटॅक आल्याने दुचाकी थेट पाटचारीत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे. यात त्यांची पत्नी व मुलगा जखमी झाला आहे.

चोपडा येथील फकीर वाडा फुलेनगर येथे राहणारे राजु बशीर पिंजारी ( वय ५५ वर्ष ) हे भुसावळ येथुन लग्नाच्या कार्यक्रमातुन आपल्या कुटुंबा सोबत परत येत होते. यावलपासून तीन किलोमीटर अंतरावर असतांना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले व घाम आला. या संदर्भात त्यांनी त्यांच्या मागे बसलेली पत्नी व मुलगा यांना माहिती दिली. यानंतर त्यांनी ब्रेक मारून दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला. यात ते दुचाकीसह हतनूरच्या पाटचारीत कोसळले. यात राजू पिंजारी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी व मुलगा हे गंभीर जखमी झाले.

दरम्यान, या रस्त्यावरून जात असतांना जितेंद्र सोनवणे यांच्यासह अन्य नागरिकांनी तातडीने रूग्णवाहिका बोलावून त्यांना ग्रामीण रूग्णालयात पाठविले. तथापि, त्या आधीच राजू पिंजारी यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांची पत्नी आणि मुलगा हे देखील अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात डॉ. प्रशांत जावळे व त्यांच्या सहकार्‍यांनी प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी चोपडा येथील खासगी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे राजू पिंजारी यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने ते पाटचारीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अपघातानंतर पिंजारी यांच्या आप्तांनी ग्रामीण रूग्णालयात गर्दी केली होती. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content