थायरॉईड ग्रस्त दोन्ही रुग्णांना मिळाले जीवदान !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाने थायरॉईड ग्रंथीने ग्रस्त दोन रुग्णांना शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढून दिलासा देण्यात यश मिळविले आहे. रुग्णांना नुकताच रुग्णालयातून निरोप देण्यात आला असून, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी विभागाच्या वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले आहे.

 

सुरेश भास्करराव पाटील (वय ३२, रा. भडगाव) यांच्या गळ्याला गेल्या १ वर्षापासून गाठ झालेली होती.  त्यांचे कुटुंब अत्यंत साधे व मध्यमवर्गीय आहे. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शल्यचिकित्सा विभागात तपासणी केली. तेथे वैद्यकीय पथकाने ही गाठ थायरॉईड ग्रंथीची असल्याने शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, असा निष्कर्ष काढला. त्यामुळे सुरेश पाटील यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनाअंतर्गत यशस्वीरित्या करण्यात आली. उपचार करण्याकामी सहयोगी प्रा. डॉ. प्रशांत देवरे, सहायक प्रा. डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी, डॉ. ईश्वरी गारसे, डॉ. स्नेहा वाडे, डॉ. विपीन खडसे, डॉ. झिया उल हक आदींनी परिश्रम घेतले.

 

दुसऱ्या घटनेत, मोतीलाल भावराव पवार (वय ३६, खडकी ता. जामनेर) यांनाही थायरॉइडच्या गाठीची समस्या अनेक दिवसांपासून भेडसावत होती. त्यांच्यावरही शल्यचिकित्सा विभागातील डॉक्टरांनी हि अवघड शस्त्रक्रिया करून रुग्णाला दिलासा दिला. १० बाय ५ सेमी एवढी गाठ काढण्यात आली. थायरॉईड ग्रंथींची प्रमाणाबाहेर वाढ होते. दुर्गम भागात आयोडीनच्या कमतरतेमुळे हि समस्या जास्त बघायला मिळते, अशी माहिती डॉक्टरनी दिली. या रुग्णावर उपचार करण्याकामी सहयोगी प्रा. डॉ. संगीता गावित, डॉ. रोहन पाटील, डॉ. प्रज्ञा सोनवणे, डॉ. किरण सोंडगे, डॉ. हर्षदा बडदे, डॉ. प्रांशू जोशी आदींनी परिश्रम घेतले.

 

थायरॉईडची गाठ गळ्याला असल्यास आवाजात बदल होणे,  श्वास घेण्यात त्रास होणे, गाठचे कॅन्सरमध्ये परावर्तन होणे, चेहऱ्याला कुरूपता येणे या सर्व गोष्टी टाळण्यासाठी वेळेत तपासणी करून निदान होणे आवश्यक आहे, अशी माहिती शल्यचिकीत्सा विभाग प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी दिली. रुग्णाला बरे केल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. मारोती पोटे यांनी वैद्यकीय पथकांचे कौतुक केले आहे.

Protected Content