जळगाव प्रतिनिधी । शहरातील नेरी नाका स्मशान भूमीजवळील आसोदा मटन हॉटेल मालकाच्या खुनाच्या आरोपातील चार संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने चौघं आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
अशी आहे घटना
प्रदीप ज्ञानदेव चिरमाडे (वय ५० रा. आसोदा ता.जि.जळगाव) यांचे नेरी नाका स्मशानभूमीजवळ आसोदा मटन हॉटेल नावाचे हॉटेल आहे. त्याच्या बाजूला उमेश बिअर शॉपी येथून प्रशांत भिवराज कोळी (वय ३०, रा. जैनाबाद) व महेंद्र उर्फ लहान्या अशोक महाजन (वय २३, रा. तळेले कॉलनी, जुना खेडीरोड, जळगाव), हेमंत संजय खैरनार (विठ्ठलपेठ), नीलेश उखा पवार (म्हाडा कॉलनी) या चौघा संशयितांनी बिअरच्या बाटल्या घेतल्या. येथेही त्यांनी बिअर शॉपीचा मालक उमाकांत कोल्हे यांना मारहाण केली. त्यानंतर ते जेवणासाठी आसोदा मटन हॉटेल येथे आले. या ठिकाणी पंकज वडनेरे व दीपक जगताप हे दोघे बसलेले होते. दोघंजण त्याच्याकडे पाहू लागल्याने आमच्याकडे काय एकटक पाहतो आहे. यावरून चौघांनी मारहाण केली. यावेळी आसोदा मटण हॉटेचे मालक प्रदीप चिरमाडे येथे समजूत घालत असतांना संशयित प्रशांत कोळी याने बिअरची बाटली फोडली अन् चिरमाडेच्या मानेवर वार करून त्यांचा खून केला. नेरीनाका स्मशानभूमीजवळील शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता ही थरारक घटना घडली. रात्री उशीरात चौघांना शनीपेठ पोलिसांनी अटक केली.
तसेच खून करण्यासाठी वापरलेली बाटलीही जप्त करण्यात आली आहे़ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे प्रयत्न केले मात्र, तेथील एक सीसीटीव्ही काही दिवसांपासून बंद असल्याचे समोर आले़ दरम्यान, चौघा संशयितांना शनिवारी आॅनलाईन पध्दतीने न्यायालयात हजर करण्यात आले़ त्यात त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़