जयंत पाटलांना पुन्हा ईडीची नोटीस : २२ रोजी होणार चौकशी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने पुन्हा नोटीस बजावत २२ मे रोजी चौकशीला उपस्थित राहण्याचे सूचित केले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पुन्हा ईडीने समन्स पाठवले आहे. या आधी देखील आयएल अँड एफएस प्रकरणी पाटील यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ईडीने बजावली होती; परंतु जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावी, असे पत्र जयंत पाटील यांनी ईडीला पाठवत चौकशीसाठी मुदत वाढवून घेतली होती. या अनुषंगाने ईडीने मुदत वाढवून देतांनाच नव्याने नोटीस बजावली आहे.

जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना ‘आयएल अँड एफएस’ प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी ‘कमिशन रक्कम’ दिल्याचा आरोप ईडीने केला आहे. याच व्यवहारांबद्दल पाटील यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळल्याने पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.

Protected Content